China-US News : अमेरिका आणि चीन (China) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अमेरिकेच्या नौदलाची दोन जहाजं तैवानमार्गावरून गेली. अमेरिकेची जहाज तैवान मार्गावरून गेल्यानंतर चीननं याची धास्ती घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देत चीननं म्हटलं आहे की, 'आम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नका.' चीन नौदनाला (China Navy) तैवान जलडमरुमध्य येथून रविवारी दोन अमेरिकी नौदलाची जहाज जाताना आढळली. यानंतर चीननं या अमेरिकन जहाजांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. आम्ही सर्व बाजूंवर लक्ष ठेवून आहोत आणि चिनी नौदल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं चीनने म्हटले आहे.
अमेरिकन संसदेच्या सदस्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील वातावरण तापलेलं आहे. त्यानंतर आता अमेरिकेची जहाज तैवान मार्गे गेल्यानंतर चीननी धास्ती घेतली आहे, असं म्हणावं लागेल. नॅन्सी यांच्या तैवान दौऱ्याला विरोध करत चीननं अमेरिकेला गंभीर इशारा दिला होता. नॅन्सी यांच्या आगमनावेळी चीननं बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानं तैपेईच्या विमानतळावर संपूर्ण अंधार करण्यात आला होता. दुसरीकडे पेलोसी यांच्या सुरक्षेसाठी प्रवासादरमयान अमेरिकेच्या तेरा लढाऊ विमानांचं सुरक्षा कवच करत नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर तैवानहून माघारी परततानाही त्यांना आडकाठी करण्याचा चीननं प्रयत्न केला होता.
दोन अमेरिकन जहाज तैवानमार्गे रवाना
दरम्यान, अमेरिकन नौदलाचे दोन जहाज तैवान मार्गाने गेल्यावर अमेरिकेनं आपली बाजू मांडली आहे. US 7 व्या फ्लीटने सांगितले की, USS Antietam आणि USS Chancellorsville ही अमेरिकन नौदलाची दोन्ही जहाज नियमित मार्गावर चालवण्यात येत आहेत. निवेदनात अमेरिकेनं पुढे म्हटलं आहे की, युद्धनौका किनारी राज्याच्या प्रादेशिक समुद्रापासून दूर असलेल्या जलडमरुमध्यतील एका कॉरिडॉरमधून पुढे गेल्या.
चीन चांगलाच संतापला
चीनने नेहमीच तैवानला आपला भाग मानलं आहे. त्यामुळे चीन हा अमेरिका आणि तैवानमधील चांगल्या संबंधाच्या विरोधात आहे. जिनपिंग यांच्या म्हणण्यानुसार आज नाही तर उद्या तैवान चीनमध्ये सामील होईलच. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन चांगलाच संतापला आहे. 'वन चायना वन पॉलिसी' अंतर्गत चीन हा तैवानला आपला भाग मानतो. त्यामुळे तैवानने कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याला चीनचा विरोध आहे. अशातच चीनचा विरोध झुगारत आज अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या. अमेरिकेच्या या कृत्यानंतर चीनचा तिळपापड झाला.