मुंबई : चीनची प्रयोगशाळा उद्या म्हणजे सोमवारी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हं आहेत. धक्कादायक म्हणजे या स्टेशनच्या मार्गात मुंबईसह महाराष्ट्राचा बराचसा भाग येतो.


टीयाँगाँग असं या चिनी स्पेस स्टेशनचं नाव असून ते साधारण स्कूल बसच्या आकाराचं आहे. मात्र खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होण्याची शक्यता आहे. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता असल्याने कोणीही त्याला हात लावू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश आहे. मात्र स्पेस स्टेशनचा वेग पाहता, ते नेमकं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.

सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी प्रयोगशाळेने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर परिसराबाबत अंदाज मांडता येईल. त्याचप्रमाणे या प्रयोगशाळेचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची चिन्हं आहेत.

2011 मध्ये टीयाँगाँग हे स्पेस स्टेशन लॉंच करण्यात आलं होतं. दोन वर्षांसाठी या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली होती, मात्र  2016 मध्ये स्पेस स्टेशनशी चीनचा संपर्क तुटला. तेव्हापासून ही प्रयोगशाळा अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत आहे.

खरं तर, हे स्पेस स्टेशन समुद्रात पाडलं जाणार होतं, मात्र त्याआधीच त्याच्यासोबत संपर्क तुटला. बहुतेक वेळा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अशा वस्तू जळून खाक होतात.