बीजिंग : चीननं पाकिस्तानकडे ये-जा करणारी संपूर्ण हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं हा निर्णय घेतला आहे. शिवाय, चीननं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासही मनाई केली आहे.


याआधीच अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याबाबत आवाहन केले आहे. त्यात आता चीनने देखील पाकवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरातून प्रतिक्रिया येत असून अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले आहे. आधी अमेरिकेनेही पाकिस्तानला झापले असून लष्करी कारवाई करायची असेल तर आधी देशातील दहशतवाद्यांवर करा, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने देखील भारताला सोबतीची खात्री दिली आहे.  आता चीनने देखील पाकवर दबाव टाकत एकप्रकारे पाकिस्तानचे पंख छाटले आहेत.

अमेरिकेनं भारताला समजूत देण्याआधी पाकिस्तानलाच दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं, असंही स्पष्ट केलंय. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकाटमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. यानंतर अमेरिकेने या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमधील या ऑपरेशनसाठी भारताला अमेरिकेची साथ मिळाली असून अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्याच्या सल्ला दिला होता.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे गरजेचे असल्याने भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले आहे. सध्या भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली होती.