चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून कार हवेत झेपावली आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दवाखान्याच्या भिंतीवर आदळली. ज्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार घुसली, तिथे एका डेंटिस्टचा दवाखाना होता.
या घटनेसंदर्भात ऑरेंज काऊंटी फायरचे प्रवक्ते कॅप्टन स्टेफिन हॉर्नर यांच्या माहितीनुसार, “आज सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास कार अपघाताची घटना घडली. कॅलिफोर्नियाच्या सांता एनामध्ये भरधाव कार इमारतीच्या थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन धडकली. या अपघातानंतर इमारतीला आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.”
अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या मदतीने इमारतीतून कार खाली उतरवली.
अग्निशमन दलानेच या विचित्र अपघाताचे फोटो शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो आता व्हायरल होत आहेत.
हॉर्नर यांच्या माहितीनुसार, "अपघातग्रस्त कारमध्ये दोघेजण होते. या अपघातानंतर कारमधील एकजण बाहेर पडण्यात यशस्वी ठरला, मात्र दुसरी व्यक्ती कारमध्येच अडकली. कारमधील दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
अपघातग्रस्त कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
दरम्यान, सुदैवाने इमारतीत अपघातस्थळी कुणीही नसल्याने जीवितहानी टळली.
पाहा व्हिडीओ :