British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील जनतेला वीज बिलांमध्ये दिलासा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ब्रिटनच्या जनतेला आश्वासन दिलं आहे की, जर ते निवडणूक जिंकले तर वीज बिलावरील व्हॅट ते कमी करणार आहेत. त्यामुळे वीज बिलांमध्ये सुमारे 200 पाऊंडची बचत होणार आहे. 


ऋषी सुनक यांच्या घोषणेचा संबंध थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्याशी जोडला जात आहे. कारण दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाकडून दिल्ली-पंजाबमध्ये 200 युनिट मोफत वीज दिली जात आहे. दिल्ली, पंजाब निवडणुकांपूर्वी आपकडून जनतेला आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार निवडणुका जिंकल्यानंतर आपनं हे आश्वासन पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे. ऋषी सुनक यांची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 


बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षात नेतृत्वासाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये ऋषी सुनक आणि लिझ ट्रस (Liz Truss) यांच्यात थेट लढत होत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणांमध्ये ऋषी सुनक मागे असल्याचं दिसत आहे. अशातच ऋषी सुनक यांनी दिलेलं आश्वासन त्यांच्या महत्त्वाचं ठरु शकतं. 


ऋषी सुनक यांनी 'द टाइम्स'शी बोलताना ही मोठी घोषणा केली. त्यांनी यासंदर्भात सविस्तर बोलताना सांगितलं की, ते वीज बिलावरील व्हॅट कमी करणार आहेत. त्यामुळे जवळपास 200 पाऊंडची बचत होणार आहे. ब्रिटनमधील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त वीज बिलांचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात वीज बिलांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा दावा नुकत्याच आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे वाढणाऱ्या महागाईमुळं अनेक लोक दारिद्र्यरेषेखाली जातील, त्यामुळे वीज बिलांत सवलत मिळणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. ऐन निवडणुकीच्या काळात ब्रिटनमध्ये वीज संकट कोसळलं आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही उमेदवारांवर दबाव वाढला आहे. 


ऋषी सुनकांनी घेतला केजरीवाल पॅटर्नचा आधार? 


दिल्ली आणि पंजाबमधील निवडणुकांच्या वेळी आम आदमी पार्टीनं मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, आता दिल्लीसह पंजाबमध्ये 200 युनिट वीज मोफत देण्यात येत आहे. ब्रिटन पंतप्रधान निवडणुकीच्या शर्यतीत असलेल्या ऋषी सुनक यांनीही केजरीवालांच्या पावलावर पाऊल ठेवत, अशीच घोषणा केली आहे. त्यामुळे ऋषी सुनक ब्रिटन पंतप्रधान निवडणुकीत केजरीवाल पॅटर्न वापरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.