British Container Ship Attack : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) किनाऱ्याजवळून जात असलेल्या ब्रिटिश कंटेनर जहाजावर अज्ञात हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली असून काही काळ परिसरात धुराचे लोट दिसत होते. ही माहिती युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) कडून देण्यात आली आहे. मात्र या घटनेत आतापर्यंत इराणचं नाव अधिकृतपणे घेतलेलं नाही.

Continues below advertisement

UAE Coast Ship Attack : जहाजाला अज्ञात शस्त्रानं हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, यूएईमधील रस अल खैमाह (Ras Al Khaimah) किनाऱ्यापासून सुमारे 25 नॉटिकल मैलांवर ही घटना घडली. जहाजाच्या कॅप्टननं दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात शस्त्र जहाजाला धडकल्यानं जहाजाचं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत जहाजावरील सर्व क्रू सदस्य सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या घटनेमुळं संपूर्ण परिसरात तणाव वाढल्याचं दिसून येतंय.

Strait of Hormuz Tension : जहाजांना सावधगिरीचा इशारा

या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातून जाणाऱ्या सर्व जहाजांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कारण हा तोच परिसर आहे जिथून जहाजांना जाण्यास इराणकडून आधीच बंदी घालण्यात आली आहे.

Continues below advertisement

इराणनं याआधीच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर आपलं नियंत्रण असल्याचा दावा केला असून कोणतंही जहाज त्यांच्या परवानगीशिवाय या मार्गाने जाऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.

Global Oil Route : जगातील महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग

हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गातून दररोज मोठ्या प्रमाणात जागतिक तेल आणि गॅस वाहतूक होते. मंगळवारी देखील या परिसरात एका जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली होती. आता ब्रिटिश कार्गो जहाजावर झालेल्या हल्ल्यानं परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचं मानलं जात आहे.

Hormuz Strait Situation : मार्च महिन्यात अनेक हल्ल्यांचे प्रयत्न

मिळालेल्या अहवालांनुसार 1 ते 10 मार्चदरम्यान हॉर्मुझ परिसरात किमान 10 तेल टँकर्सवर हल्ले किंवा हल्ल्याचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा देत जर हॉर्मुझ सामुद्रधुनीत समुद्री माईन्स टाकल्या तर गंभीर लष्करी परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या काही अहवालांमध्ये, इराण जहाजांच्या मदतीनं समुद्री माईन्स टाकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेनं 16 इराणी जहाजं नष्ट केल्याचाही दावा केला आहे.

दुसरीकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून (IRGC) या संपूर्ण परिसरावर आपलं नियंत्रण असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर अमेरिकेची अत्याधुनिक युद्धनौकाही आली तरी आम्ही तयार आहोत, असा इशाराही देण्यात आला आहे.

ही बातमी वाचा: