कॅण्डी : लग्नात वधूची भली मोठी आणि लांब साडी सावरण्यासाठी शेकडो शाळकरी मुलांचा वापर केल्याप्रकरणी श्रीलंकेतील दाम्पत्याची चौकशी करण्यात येणार आहे.

श्रीलंकेच्या कॅण्डी शहरात हा शाहीविवाह सोहळा रंगला. यामध्ये वधूने तब्बल दोन मैल म्हणजेच 3.2 किमी लांबीची साडी नेसली होती. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हे दाम्पत्य चालत जाताना वधूची साडी सांभाळण्यासाठी तब्बल 250 विद्यार्थ्यांना ट्रेनसारखं उभं केलं होतं. श्रीलंकेत कोणत्याही वधूने नेसलेली ही सर्वात लांबीची साडी आहे.

शाळेच्या वेळेत अशा सोहळ्यांसाठी विद्यार्थ्यांचा वापर करणं कायद्याविरोधात आहे. कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं राष्ट्रीय बाल संरक्षण प्राधिकरणाने (एनसीपीए) म्हटलं आहे.



सरकारी शाळेतील 100 विद्यार्थिनींना लग्नात पाहुण्यांना फुलं वाटण्याच्या कामात गुंतवलं होतं. लग्नासारख्या कार्यक्रमात सरकारकडून शाळकरी मुलांकडून अशी कामं करवून घेतल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

या लग्नात देशाच्या मध्य प्रांताचे मुख्यमंत्री सरत एकनायके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे लग्नात जी मुलं होती, त्यांच्या शाळेचं नावही मुख्यमंत्र्यांच्या नावावर आहे.

"हा ट्रेण्ड बनू नये म्हणून आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे," असं एनसीपीएचे संचालक मारिनी डे लिवेरा यांनी सांगितलं. "तसंच त्यांनी जे केलं, ते बाल अधिकाराचं उल्लंघन आहे. मुलांना शिक्षणापासून वंचित करणं, त्यांच्या सुरक्षेशी धोका पत्करणं, त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणं, हा फौजदारी गुन्हा आहे," असंही ते मारिनी डे लिवेरा म्हणाले.