लाईव्ह बातम्या देणाऱ्या अँकरच्या डोक्यावर पक्षी येऊन बसला
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 12:50 PM (IST)
ही घटना कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागोच्या केएफएमबी टीव्हीमध्ये घडली आहे. आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कॅलिफोर्निया : जर तुम्ही लाईव्ह बातम्या पाहात असला, आणि अचानक अँकरच्या डोक्यावर पक्षी येऊन बसला तर? हे दृश्य पाहताना तुम्हालाही जरा विचित्र वाटेल. पण अशीच घटना कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागोच्या केएफएमबी टीव्हीमध्ये घडली आहे. आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सॅन डियागोच्या केएफएमबी टीव्हीवर सकाळचा शो सुरु होता. या शोचं नाव ‘पक्ष्यांच्या घरट्यांचा दिवस’ असं होतं. हा शो निकेल मेडिया आणि एरिक कानहर्ट हे दोन अँकर सादर करत होते. तेवढ्यात एक पक्षी निकेल मेडिया यांच्या डोक्यावर येऊन बसला. ही घटना पाहून प्रेक्षकांसह निकेलसोबत अँकरिंग करणाऱ्या एरिक कानहर्ट यांनाही हसू आवरत नव्हते. तर निकेल यांनाही काही बोलता येत नव्हते. त्या केवळ स्मित हास्य करुन शांत बसल्या होत्या. लाईव्ह कार्यक्रमावेळी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ तात्काळ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील निकेल यांच्या डोक्यावर बसलेला पक्षी स्कारलेट बर्ड आहे. हा पक्षी कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो पक्षी अभयारण्याचा निवासी आहे. निकेल यांच्या डोक्यावर पक्षी येऊन बसण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी अशी कोणतीही योजना केलेली नव्हती. हे सर्व अनपेक्षितपण घडले. घटनेचा व्हिडीओ पाहा