न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ओबामांनी दीप प्रज्वलित करुन आपल्यानंतर येणारे राष्ट्राध्यक्षही ही परंपरा कायम राखतील, अशी आशा व्यक्त केली.


ओबामांनी 2009 मध्ये सर्वात प्रथम व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारे ते अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरले होते. त्यांनी व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्येही दिव्यांची आरास केली. यावेळी अमेरिकन आणि भारतीय कर्मचारी उपस्थित होते.

'2009 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणारा अमेरिकेचा पहिला अध्यक्ष ठरल्याने माझ्या मनात सन्मानाची भावना होती. दिवाळीच्या निमित्ताने मी आणि मिशेल मुंबई दौऱ्यावर असताना आमचं झालेलं स्वागत आणि डान्स, आम्ही कधीच विसरु शकत नाही.' असं ओबामांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

'ओव्हल ऑफिसमध्ये पहिल्यांदा दीप प्रज्वलित करुन मला आनंद झाला. अंधारावर नेहमी प्रकाशाचा विजय होतो, याचं हा दिवा प्रतीक असतो. माझ्यानंतर येणारे अध्यक्ष ही परंपरा कायम राखतील', अशी आशा ओबामांनी व्यक्त केली आहे.