सिडनी : ऑस्ट्रेलियानं लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी स्पष्टपणे म्हटलं की मानसिक आरोग्य आणि त्यांचा विकास सुरक्षित राहण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. 16 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई करणारा कायदा डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेला मुलगा किंवा मुलगी अकाऊंट उघडू शकत नाही किंवा जुनं अकाऊंट सुरु ठेवू शकणार नाही.
Australia Ban on Social Media : ऑस्ट्रेलियाकडून लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई
ऑस्ट्रेलिया सरकारनं ऑनलाईन सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2024 सादर केलं आहे. त्यानुसार देशातील 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यानं सोशल मीडिया वापरणं बेकायदेशीर असेल. याचाच अर्थ सोशल मीडियावर खातं उघडण्यासाठी ऑस्ट्रेलियात किमान वय 16 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वय असून देखील जे सोशल मीडिया वापरतात त्यांची अकाऊंट बंद होतील. मुलांना इंटरनेटवरील वाढत्या संकटांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी?
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयानुसार हा नियम सर्व मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू असेल. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट, आणि किक यावर देखील हा निर्णय लागू असेल. ऑस्ट्रेलियातील कोणताही 16 वर्ष पूर्ण नसलेला मुलगा किंवा मुलगी खातं उघडू शकणार नाही. 16 वर्ष पूर्ण नसलेल्यांची खाती बंद करावी लागतील. याशिवाय वयाची पडताळणी करण्यासाठी नवी यंत्रणा सुरु करावी लागेल.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी म्हटलं की हा कायदा लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे पाऊल आमच्या मुलांना ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी उचललं आहे. डिजीटल विश्व मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विकासाच्या किमतीवर चालू शकत नाही. इंटरनेट मुलांच्या शिक्षणाचं आणि मनोरंजनाचं साधन असावं मात्र मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु नये, असं अँथनी अल्बनीज म्हणाले.
ऑस्ट्रेलियन सरारनं जगभर केलेल्या अध्ययनांचा दाखला दिला. मुलांमध्ये आणि किशोरवयीन वयोगटात सोशल मीडियाचं व्यसन वेगानं वाढत आहे. सातत्यानं स्क्रीन पाहिल्यानं मुलांच्या झोपेवर परिणाम होतो. चिंता आणि अस्वस्थता वाढते. ऑस्ट्रेलियन सरकारकच्या घोषणेनुसार हा नियम 10 डिसेंबर 2025 पासून लागू होईल.