Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प ( Zaporizhzhia Nuclear Power Plant)युक्रेनमधील महत्त्वाचा ऊर्जा स्त्रोत आहे. या प्रकल्पामध्ये युक्रेनियन कामगार कार्यरत आहेत. मात्र हा अणू ऊर्जा प्रकल्पावर रशियाने मार्च महिन्यातच ताबा मिळवला आहे. आता रशियाकडून या प्रकल्पाजवळील परिसरात हल्ले सुरु आहेत. दरम्या युक्रेनकडूनही रशियाला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या परिस्थिती भारतानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.


गुरुवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युक्रेन आणि रशिया युद्धा चर्चा झाली. युक्रेन आणि रशियामध्ये मागील सुमारे 170 दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. या परिस्थितीवर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे की, 'भारताने अणु सुविधा आणि सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून दोन्ही देशांना परस्पर संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे.'


मोठा अपघात होण्याची शक्यता


युक्रेनमधील महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत असलेल्या अणूऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहे. परिणामी अणूऊर्जा प्रकल्पाचा स्फोट झाल्यास मोठा अपघात होऊन नागरिकांवर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे रशियाने संयम बाळगणं गरजेचं आहे. 


झापोरिझ्झ्या अणूऊर्जा प्रकल्प कुठे आहे?
युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणूऊर्जा प्रकल्प प्लांट हा युरोपमधील सर्वात मोठा आणि जगातील 10 सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. युक्रेनमधील अणुऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी निम्म्याहून अधिक विज या प्रकल्पात तयार होते. या प्रकल्पाची एकूण क्षमता सुमारे 6,000 मेगावॅट वीज निर्मितीची आहे. या द्वारे सुमारे चार दशलक्ष घरांना वीजपुरवठा करता येईल. 


झापोरिझ्झ्या अणूऊर्जा प्रकल्प दक्षिण युक्रेनमध्ये नीपर नदीच्या काठावर आहे. हा प्रकल्प युक्रेनची राजधानी कीव्हच्या दक्षिण-पूर्वेस अंदाजे 550 किमी आणि चेरनोबिलच्या दक्षिणेस सुमारे 525 किमी अंतरावर आहे. झापोरिझ्झ्या प्रकल्प क्रिमियापासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे.


झापोरिझ्झ्या अणूऊर्जा प्रकल्पाचं महत्व


सध्या झापोरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्प युक्रेनियन कर्मचारी चालवत आहेत, परंतु त्यावर रशियन सैन्यानं ताबा मिळवला असून त्याची सुरक्षा रशियन सैन्याकडे आहे. इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सीच्या मते या प्रकल्पामध्ये युरेनियम 235 असलेले सहा सोव्हिएत-डिझाइन केलेले वॉटर-कूल्ड रिअॅक्टर्स आहेत. यातील प्रत्येक रिअॅक्टर्सची वीजनिर्मितीची क्षमता 950 मेगावॅट इतकी आहे. एक मेगावॅट क्षमता एका वर्षात 400 ते 900 घरांना ऊर्जा पुरवू शकते. युक्रेनने मंगळवारी दावा केला की रशियन सैन्य प्लांटद्वारे तयार होणारी वीज क्रिमियन वीज ग्रिडला जोडण्याची तयारी करत आहे.