Ukraine Russia War : दोन आठवडे उलटले तरीही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. युद्धामुळे रशियातील शहरं भकास झाली, अनेकांची घरे उजडली. नागरिकांना युक्रेन सोडावं लागले. या युद्धाचा परिणाण जगावरही झाला. सर्वात जास्त नुकसान युक्रेनचं झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच रशियाविरोधीत युद्धात झालेल्या नुकसानावर वक्तव्य केले आहे. रशियाविरोधातील युद्धात युक्रेन सैन्यांच्या झालेल्या नुकसानासोबत 1300 जणांचा मृत्यू झाल्याचे व्होदिमर झेलेन्स्की यांनी सांगितले आहे. AFP ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा नुकताच व्होदिमर झेलेन्स्की यांनी रशियाच्या नेत्यांना दिला होता. तसेच आर्थिक निर्बंधामुळे तेथील नागरिक तुमचा तिरस्कार करतील, असेही व्होदिमर झेलेन्स्की म्हणाले होते. व्होदिमर झेलेन्स्की यांनी गुरुवारी एका व्हिडिओत म्हटले होते की,  "युद्ध गुन्ह्यामुळे निश्चितपणे तुमच्याविरोधात (रशिया) खटला भरला जाईल." 


दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात युक्रेन रशियाला कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. युक्रेनने 11,000 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियाने मारियुपोलमध्ये 3 लाख नागरिकांना बंधक बनवल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्वीट करत हा आरोप केला होता. दिमित्रो कुलेबा ट्वीट करत म्हणाले आहेत की, रशियाने मारियुपोलमध्ये 300,000 नागरिकांना बंधक बनवलं आहे. आयसीआरसीचा मध्यस्थी करार असूनही ते लोकांना शहर सोडण्यापासून रोखत आहेत.  






अमेरिकेकडून रशियावर निर्बंध - 
अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर नवीन निर्बंध लादले. यावेळी त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला आहे."आम्ही रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालत आहोत. आम्ही इतिहासातील आर्थिक निर्बंधांचे सर्वात महत्त्वाचे पॅकेज लागू करत आहोत आणि यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण नुकसान होईल. आमचे अनेक युरोपियन सहयोगी आणि भागीदार आमच्या या निर्णयात सहभागी होण्याच्या स्थितीत नसतील हे समजून आम्ही पुढे जाऊ," असे जो बायडन यांनी म्हटले होते.