इम्रान खानच्या प्रचारासाठी माधुरी आणि बिग बी?
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2018 12:54 PM (IST)
इम्रान खान यांच्या पक्षासाठी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि बिग बी अमिताभ बच्चन प्रचार करत असल्याचं या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.
कराची : राजकारण आणि बॉलिवूड यांचं कनेक्शन सर्वश्रुत आहे. मात्र हे लोण भारतीय राजकारणापुरतं मर्यादित न राहता सीमेपार पोहचल्याचं दिसत आहे. पाकिस्तानी निवडणुकांच्या तोंडावर सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झालं आहे. इम्रान खान यांच्या पक्षासाठी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि बिग बी अमिताभ बच्चन प्रचार करत असल्याचं या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चं निवडणूक चिन्ह असेलली क्रिकेट बॅट या व्हायरल पोस्टरवर आहे. त्यासोबत माधुरी आणि अमिताभ यांचे तरुणपणीचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून इम्रान खान यांनी प्रचारासाठी बॉलिवूडमधील हुकमी एक्के बोलावल्याच्या अफवा पसरल्या आहेत. पोस्टरवर सरदार अब्बास डोगर आणि सरदार ओवेस डोगर अशा दोन व्यक्तींचेही फोटो आहेत. फोटोखाली उर्दू भाषेत त्यांची नावं लिहिण्यात आली आहेत. 'मै झुका नही, मै बिका नही, कही छुपा छुपा के खडा नही, जो डटे हुए है लडाई के मैदान में, मुझे उन लोगों मे तलाश कर' असं उर्दूमध्ये लिहिल्याची माहिती आहे.