न्यूयॉर्क : एका गर्भवती तरुणीचा गर्भ पाडल्याप्रकरणी अमेरिकेतील एका महिलेला कोर्टाने तब्बल शंभर वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. अमेरिकेला हादरवून सोडलेल्या या गुन्ह्यासाठी आरोपी डॅनियल लेनला सात कलमांखाली दोषी सिद्ध करण्यात आलं होतं.
डॅनियलवर हत्येचा प्रयत्न, गर्भवती महिलेचा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न यासारख्या सात आरोपांच्या आधारे खटला चालवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात डॅनियलवर दोष सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. हत्येचा प्रयत्न किंवा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यात अमेरिकेतील कोर्टाने ठोठावलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे.
मिशेल विलकिन्स नावाची 27 वर्षीय तरुणी मार्च 2015 मध्ये सात महिन्यांची गर्भवती होती. आरोपी लेनने तिला आपल्या घरी बोलवलं. त्यानंतर तिच्या पोटात चाकू खुपसून तिला बेशुद्ध केलं. इतक्यावरच न थांबता तिने तरुणीच्या गर्भातून न जन्मलेलं बाळ बाहेर काढलं. त्या बाळाचा काही काळातच मृत्यू झाला. सुदैवाने मिशेल या हल्ल्यातून बचावली. तिने कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारे हा खटला चालवण्यात आला.
या कृत्यानंतर लेनने मिशेलला रुग्णालयात दाखल केलं आणि तिचा गर्भपात झाल्याचा दावा केला. मात्र यावर संशय आल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि तिला अटक झाली. मिशेलच्या वडिलांनी हे कृत्य अत्यंत क्रूर असल्याचं कोर्टात सांगितलं. 'असं घृणास्पद कृत्य कोणी करु शकतं, यावरही विश्वास बसत नाही.' असं मत कोर्टाने व्यक्त केलं.