Russia Ukraine Conflict : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, अमेरिकेने जर्मनीला सात हजारांहून अधिक सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य जर्मनीला अतिरिक्त 7000 सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या विविध प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता दिल्यानंतर लष्करी कारवाईचे आदेश दिले असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.


अमेरिकेने 7000 अतिरिक्त सैनिक जर्मनीला पाठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, नाटोच्या प्रतिसादाचा एक भाग म्हणून मी आता अतिरिक्त अमेरिकन लष्करी शक्ती जर्मनीमध्ये तैनात करण्यासाठी अधिकृत करत आहे. यापूर्वी गुरुवारी, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की यूएस युरोपियन कमांडचे प्रमुख जनरल टॉड वोल्टर्स यांच्या विनंतीवरून युतीने आपल्या संरक्षण योजना सक्रिय केल्या आहेत.


रशिया नाटोच्या विस्तार योजनेच्या विरोधात
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये नाटोचे कोणतेही सैन्य नाही परंतु नाटो सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि नाटोची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी काम सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणाव आणि भीतीनंतर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. दोघांमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे नाटोची विस्तार योजना थांबवण्यासाठी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर दबाव आणत आहेत. सध्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर आणखी अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला या कृतीसाठी गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सांगितले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha