America Corona omicron update : अमेरिकेमध्ये एकीकडे कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचं संकट वाढत असताना दुसरीकडे मदतनिधीत मोठा घोटाळा झाला असल्याचं उघड झाली आहे. कोरोना मदतनिधीमध्ये 100 अब्ज डॉलर्सचा घोटाळा झाला आहे. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने सादर केलेल्या अहवालामधून हा प्रकार समोर आला आहे. मदतनिधीमधील 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेसात लाख कोटी रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना काळात फसवणूक करत सरकारी मदत मिळवणाऱ्या 30 जणांविरोधात आम्ही कारवाई केली आहे, असं व्हर्जेनिया राज्याच्या अटॉर्नी जेसिका आर्बर यांनी सांगितलं आहे. अमेरिकन सरकारने सुरु केलेल्या पे चेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी), इकनॉमिक इंज्युरी डिझास्टर लोन (ईआयडीएल) आणि अनएम्प्लॉमेंट इन्शुअर्न्स (युआय) या तीन योजनांअंतर्गत घोटाळे झाल्याचं उघड झालं आहे.
अमेरिकेतील न्याय विभागाने आतापर्यंत 150 जणांविरोधात कारवाई करुन 75 मिलियन अमेरिकन डॉलर्सची वसूली केली आहे. करोना कालावधीमध्ये मदत म्हणून गरजूंना सरकारकडून देण्यात येणारे पैसे या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्यांनी फसवणूक करुन मिळवल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
अमेरिकेतील कामगार विभागाने बेरोजगारीसंदर्भातील भत्त्यामध्ये मोठी रक्कम लाटण्यात आल्याचा दावा केला आहे. बेरोजगारांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या रक्कमेबरोबर कर्जाच्या नावाखाली फसवणूक करुन मिळवलेल्या रक्कमेमधून 1.2 बिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम विभागाने परत मिळवली आहे. तर फसणवूक करुन मिळवलेले 2.3 बिलियन अमेरिकन डॉलर्सही विभागाने यशस्वीपणे परत मिळवले आहेत. करोना कालावधीमध्ये बेरोजगार असल्याचं सांगून सरकारी मदत घेणारी 900 हून अधिक प्रकरण तपासामध्ये समोर आली आहेत.
पीपीपी योजनेअंतर्ग अनेक छोट्या उद्योजकांनी सरकारकडून खोटी कागदपत्रं दाखवून कर्जाची रक्कम घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Omicron Variant : तामिळनाडूत 'ओमायक्रॉनचा स्फोट'; एकाच वेळी 33 रुग्णांची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha