Ian Hurricane : अमेरिकेतील (America) इयान चक्रीवादळामुळे आज 2000 उड्डाणे रद्द करण्यात आली. हजारो लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. इयान चक्रीवादळ मंगळवारी अमेरिकेच्या मेक्सिकोच्या आखातात दाखल झाले. नॅशनल हरिकेन सेंटरचे एरिक ब्लेक यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत चौथ्या श्रेणीचे धोकादायक वादळ बनण्याचा अंदाज आहे.  फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट Flightaware.com नुसार, एअरलाइन्सने मंगळवारी युनायटेड स्टेट्समधील 367 आणि बुधवारी 1,748  उड्डाणे रद्द केली.


वाऱ्याचा वेग ताशी 205 किलोमीटर


इयान चक्रीवादळ मंगळवारी मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांसह क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले. हे चक्रीवादळ उत्तरेकडे वेगाने सरकत असून ते मेक्सिकोतून अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटर (USNHC) ने सांगितले की ते स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता क्युबाच्या किनारपट्टीवर धडकले. इयान हे तिसऱ्या श्रेणीचे सागरी चक्रीवादळ आहे. ज्यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 205 किलोमीटर असतो. बुधवारी पहाटे ते गुरुवार संध्याकाळपर्यंत 130 mph (209 kph) पर्यंत चक्रीवादळाचे वारे आणि 2 फूट (0.6 मीटर) इतका पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


चौथ्या श्रेणीच्या चक्रीवादळात रूपांतर होण्याची भीती


यूएस नॅशनल हरिकेन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, इयान चक्रीवादळ वाढत आहे. फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहोचेपर्यंत त्याचे चौथ्या श्रेणीच्या चक्रीवादळात रूपांतर होण्याची भीती आहे. त्याच वेळी, खबरदारी घेत, क्युबन सरकारने चक्रीवादळ पोहोचण्यापूर्वीच देशातील पिनार डेल रिओ प्रांतातून 50 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने देशात मोठ्या प्रमाणात शिबिरे उभारली आहेत.


कॅनडातील फियोना चक्रीवादळ, आठ जणांचा मृत्यू


कॅनडामधील फिओना या तीव्र चक्रीवादळाने धडक दिली, पूर्व कॅनडात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आणि शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. वादळामुळे पोर्तो रिको आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


फिलीपिन्समधील नोरू चक्रीवादळ


सुपर टायफून नोरू फिलीपिन्सच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. अंदाजानुसार, नोरू ग्रेट स्टॉर्ममध्ये ताशी 240 किमी वेगाने वारे वाहू शकतात. तसेच, सुपर टायफून नोरूमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 300 किमीपेक्षा जास्त असू शकतो. म्हणजेच नोरू चक्रीवादळात वाऱ्याचा वेग भारतातील सर्वात वेगवान ट्रेनच्या वेगापेक्षा जास्त असेल.


क्युबाच्या किनार्‍यावर 14 फुटांपेक्षा जास्त उंच लाटा
यूएसएनएचसीने (USNHC) सांगितले की चक्रीवादळाने क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीपासून 14 फूट उंच लाटा निदर्शनास आल्या आहेत. यूएसएनएचसीचे वरिष्ठ तज्ञ डॅनियन ब्राउन यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितले की, क्युबाला याआधी भीती वाटत होती की, चक्रीवादळ धोकादायक लाटा आणि मुसळधार पावसाने धडकेल. क्युबाच्या पलीकडे इयान जेव्हा मेक्सिकोच्या आखातात पोहचला आहे. तेव्हा ते आणखी शक्तिशाली होण्याची अपेक्षा आहे. आज हे वादळ फ्लोरिडा किनाऱ्यावर पोहचले, तेव्हा वाऱ्यांचा वेग ताशी 225 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो.