Afghanistan Earthquake Update : अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये जमीन हादरली आहे. अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) आला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विनाशकारी भूकंपात 2000 जणांचा मृत्यू
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भीषण भूकंप झाला आहे. 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपानंतर जोरदार झटके बसल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 2,000 च्या पुढे गेली आहे.
विनाशकारी भूकंपानंतरचं वास्तव दाखवणारी दृश्यं
अलजरीरा रिपोर्टनुसार, शनिवारी सकाळी 11 वाजता अफगाणिस्तानमधील हेरात शहराच्या पश्चिमेला 40 किमी अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर शेजारील बडघिस आणि फराह प्रांतात जोरदार हादरे जाणवले.
भूकंपानंतरही जोरदार हादरे
शनिवारी अफगाणिस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती. या शक्तिशाली भूकंपानंतरही पश्चिम अफिगाणिस्तानमध्ये भूकंपानंतर जोरदार हादरे म्हणजे आफ्टर शॉक बसले. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी माहिती देत सांगितलं की, भूकंप आणि आफ्टरशॉकमुळे हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातील चार गावांतील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. फराह आणि बगेस प्रांतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमधील जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी झेंडा जान येथे 12 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :