ग्वाटेमाला (सॅन जोस पिनुला): मध्य अमेरिकेतील सॅन जोस पिनुलामधील ग्वाटेमालामध्ये शरणार्थी कॅम्पमधील १९ युवतींचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक वृत्त समजतं आहे. कुपोषण आणि अत्याचारग्रस्त मुलींना या सरकारच्या कॅम्पमध्ये ठेवलं जातं. मात्र, काल रात्री या कॅम्पला अचानक आग लागली. या आगीत १४ ते १७ वयोगटातल्या तब्बल १९ मुलींचा मृत्यू झाला, तर आणखी २५ लोक चांगलेच होरपळले आहेत.


जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मुलींच्या या मृत्यूमुळं संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्थानिक मीडियाच्या मते, 400 जणांची क्षमता असलेल्या या कॅम्पमध्ये चारशेहून अधिक जण राहत होते. ग्वाटेमालातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.