कोलंबो: श्रीलंकेच्या काडुगन्नावा शहरातील 17 वर्षीय एका मुलानं राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची अधिकृत वेबसाईट हॅक केली. या प्रकरणी श्रीलंकेच्या राष्ट्रपती विभागाच्या मीडिया विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींची अधिकृत वेबसाईट गुरुवार आणि शुक्रवारी हॅक करण्यात आली. दुसऱ्या सायबर हल्ल्यानंतर ही वेबसाईट ऑफलाईन ठेवण्यात आली. याची बातमी स्थानिक मीडियामध्ये प्रकाशित झाल्यानंतर, तत्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश सीआयडीला देण्यात आले.
या घटनेतील पहिला सायबर हल्ला गुरुवारी संध्याकाळी झाला. हॅकरने वेबसाईट हॅक करून यावर सिंहली भाषेत संदेश टाकला होता. या मॅसेजमध्ये 'श्रीलंकन यूथ'च्या नावाने कार्यरत एका संघटनेने सीरियामध्ये एप्रिलमध्ये जीसीआय अॅडव्हान्स लेव्हल परिक्षा घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यात यावा, असं म्हटलं असल्याचं राष्ट्रपतींच्या मीडिया अधिकाऱ्यांनी सांगितलं. याशिवाय या मॅसेजमधून इतरही काही मागण्या करण्यात आल्या होत्या.