Shooting in America : अमेरिकेत जोरदार गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोर गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.


न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये अचानक गोळीबार झाला. यावेळी अनेकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूकधारी व्यक्तीने लष्करी पद्धतीचे कपडे घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधारी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. टॉप फ्रेंडली मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात किमान दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी जखमींची संख्या आणि स्थिती याबद्दल तत्काळ माहिती दिली नाही. 


दरम्यान, एफबीआयचे पथक संशयितांची चौकशी करत आहे. तपासकर्त्यांना संशय आहे की बंदूकधारी व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये तो पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने गोळीबार सुरु केला. या फुटेजमध्ये संशयित एका सुपरमार्केटमध्ये घुसून आतमध्ये अनेक लोकांना गोळ्या घालताना दिसत आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली आहे. 


या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अचानक असा गोळीबार झाल्याने तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या गोळीरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी गोळीबार करण्याऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.