मुंबई : बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. कालच्या विकेंडच्या डावात बाप्पा जोशी अर्थात विद्याधर जोशी बाहेर पडले. त्यांचं जाणं अनपेक्षित असल्याने घरातल्या प्रत्येकालाच त्यांच्या जाण्याने धक्का बसला. पण आता या घटनेला मागे सारत आणि शो मस्ट गो ऑन या नियमाला अनुसरुन घरातल्या सदस्यांनी नव्या उत्साहाने खेळायला सुरुवात केली आहे. आज घरात एक वेगळाचं खेळ खेळला जाणार आहे. आज बिग बॉसच्या घरात चक्क बिन बांगड्यांचा स्वयंपाक होणार आहे.


काय आश्चर्य वाटलं ना? हो आज बिग बॉसच्या घरातल्या महिलांना स्वयंपाक घरातून सुट्टी देण्यात आली आहे आणि सगळी पुरुष मंडळी स्वयंपाक घरात राबणार आहेत. आता या सगळ्यात कोणाचं पाककौशल्य किती पणाला लागतं आणि कोणाची प्रयोगशीलता काय नवे शोध लावते हे आज रात्री कळणार आहे.

ब्रेकफास्ट न्यूज : बिग बॉसच्या घरातील अनुभव कसा होता? अनिल थत्ते यांच्याशी गप्पा



आज या आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कॅप्टन निवडीसाठी नवीन टास्कही घरातल्या सदस्यांना देण्यात येणार आहे. मनोरा विजयाचा असं या टास्कचं नाव असून किशोरी शहाणे आणि शीव ठाकरे यावळे कॅप्टन पदाचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारतय आणि कोण कॅप्टनपदाचा प्रबळ दावेदार ठरतोय हे आज रात्री कळेलच. इतर खेळांप्रमाणे हा खेळही चुरशीचा होईल यात शंका नाहीच.

स्ट्रॅटेजी, खेळ, एकमेकांवर कुरघोडी, भांडणं या साऱ्यासाठी बिग बॉसचं घर प्रसिद्ध आहेच. पण या सगळ्यासोबतच बिग बॉसच्या घरातले हेच सदस्य अत्यंत खेळीमेळीने मजा मस्ती करताना सुद्धा दिसतात. गेले चार आठवडे बिग बॉसच्या या पर्वातले सदस्य केवळ एकमेकांशी भांडताना, दोषारोप करताना दिसले. त्यातच शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले या दोन सदस्यांमुळे घरातला ताण ही कमालीचा वाढला होता. या सगळ्या प्रकारांमुळेच प्रेक्षकही या पर्वाची तुलना पहिल्या पर्वाशी करु लागले. पहिल्या पर्वाइतकी मजा हे पर्व बघताना येत नाही असा नाराजीचा सूरही प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला होता. पण आज बिग बॉसच्या घरातले सगळे सदस्य खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या पलिकडे जाउन धमाल करताना दिसणार आहेत.