वाशिम: जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिमच्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा एकदा दोन्ही पंथीयांमध्ये वाद होत हाणामारीची घटना घडली. शिरपूरच्या भगवान पार्श्वनाथ मंदिरात दोन्ही पंथिय पूजेसाठी पोहोचले असता पूजेवरून चांगलीच हाणामारी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्ती केली.
वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये कायम वाद होत असतात. आज मात्र या वादाचं पर्यवसन थेट हाणामारीत झालंय. या घटनेनंतर दोन्ही पंथीयांच्या भक्तांनी मंदिराबाहेरच ठिय्या दिला आणि घोषणाबाजी केली.
लाकडी काठ्यांनी एकमेकांना भिडले
शिरपूर जैन येथील मंदिर परिसरात आजची सकाळी नेहमीसारखीच होती. भाविक येत होते. ठरल्याप्रमाने सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंतची वेळ ही श्वेतांबर पंथियांना ठरविण्यात आलेली आहे. तर दिगंबर पंथियांसाठी सकाळी 9 ते 12 ही वेळ पूजेसाठी देण्यात आलेली आहे. मात्र या दरम्यान दिगंबर पंथीयांची एक वृद्ध महिला आणि तीन ते चार भाविक दर्शन रांगेत घुसल्याचं कारण देत वाद निर्माण झाला. नंतर या वादाचं पर्यवसन हे हाणामारीत झालं. दोन्ही बाजूंकडून लाकडी काठ्या आणि दंडुक्याच्या साहाय्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्ही पंथियांनी मंदिराच्या बाहेर ठिय्या मांडला होता. त्यामुळे मंदिर परिसरात तणावाचं वातावरण होतं. खरं तर काही महिन्यांपूर्वी अटी शर्थींवर हे मंदिर भाविकांसाठी उघडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली होती. मंदिर उघडल्यावरही लेपन प्रक्रियेवरून वाद उफाळून आला होता. मात्र प्रशासनाच्या मध्यस्तीनं तो वाद मिटला. त्यात आजच्या घटनेची भर पडली आहे. त्यामुळे या वादावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न, मंत्र्याचा हात असल्याचा आरोप
दिगंबर पंथीयांकडून महाराष्ट्रातील दिगंबर समाजातील जैन धर्मियांच्या अनुयायींवर गुजराती श्वेतांबर पंथीयांकडून दादागिरी आणि मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसचे मंदिरावर ताबा मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात असून त्यामध्ये राज्यातील एका मंत्र्याचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
जगात अनेक जातीधर्माचे आणि पंथाचे लोक आपापल्या दैवताला मानतात आणि त्यांनी दिलेला संदेश उराशी बाळगून त्याच्या शिकवणीचे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोरच त्यांचे अनुयायी एकमेकांना भिडत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ही बातमी वाचा: