Washim:वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका एका 7 वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. मात्र, सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावल्याचा प्रकार वाशिमच्या अनसिंग इथून समोर आलाय. गावातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका विद्युत खांबाला हालू नये म्हणून तणावासाठी लोखंडी दोर बांधलेला होता. याच दोराला खेळता खेळता चिमुकलीचा स्पर्श झाला. त्या दोरातून विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने चिमुकली तारेला चिकटली आणि जोरात किंचाळली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला वेळेत बाजूला केले आणि अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात वीज वितरणच्या कारभार अनेक ठिकाणी ढेपाळल्यामुळे मागील काही दिवसात विद्युत खंडित राहत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
नेमके घडले काय?
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग गावात 7 वर्षांची चिमुकली घराजवळील रस्त्यावर इतर मुलांसोबत खेळत होती. याच दरम्यान, रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका विद्युत खांबाला हालू नये म्हणून बांधलेल्या लोखंडी तणावाच्या दोराला ती अनवधानाने स्पर्श करती झाली. या दोरातून विद्युत प्रवाह सुरू असल्याने तिला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्याने ती तारेला चिटकली.जोरात किंचाळल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले.तिची आईही काही क्षणांत तिथे पोहोचली. सतर्कतेने आणि प्रसंगावधान राखत नागरिकांनी तिला तारांपासून दूर केलं. वेळेवर मदत मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
महावितरणकडून खांबांची आणि तारा तसेच विद्यूतप्रवाह असणाऱ्या दोऱ्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महावितरणच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. वीज वाहिन्यांची योग्य देखभाल होत नसल्याने अशा घटना घडत असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा: