Agriculture News : वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या वातावरणातील बदलाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे थंडी आणि तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळं आणि गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या धुक्यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
फवारणीसाठी औषधांचा मोठा खर्च
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण बदलत्या हवामानाचा त्यांच्या पिकांवर परिणाम होत आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळं आधीच हरभरा पिकावर मर रोगाची लागण झाली होती. कसेबसे पिक जगवण्याची धडपड सुरु असताना आता घाटे आळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही कापूस आणि हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव
आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad)काही भागात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर कापसावर (Cotton) देखील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळं औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव, वेरूळ, पळसवाडी, कसाबखेडा, चिंचोली, पिंपरी, आखतवाड़ा परिसरात हरभऱ्यावर मर, तर कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तळकोकणातील सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत
तळकोकणातील सुपारी उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा सुपारी पिकावर परिणाम होत आहे. सुपारीला गळ लागली आहे. गळ लागलेल्या सुपारीला योग्य दर नाही, त्यामुळं सुपारी फेकून देण्याची वेळ आली आहे. तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: