Wardha News : सापांबद्दलच्या अज्ञानामुळे एका व्यक्तीने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना वर्धा (Wardha) जिल्ह्यात घडली आहे. धामण (Dhaman Or Indian Rat Snake) जातीचा साप समजून मण्यार (Common Krait Snake) जातीच्या सापासोबत खेळणं त्याच्या अंगलट आलं. या सापाच्या दंशाने त्याचा मृत्यू झाला. प्रशांत उर्फ बबलू काकडे (वय 42 वर्षे रा. सानेवाडी) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.


अविवाहित असलेला बबलू काकडे पेंटिंगचे काम करायचा. गुरुवारी (29 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता त्याने एका घरातून या मण्यार जातीच्या सापाला पकडलं होतं. परंतु सापाबद्दल फारशी माहिती नसतानाही, हा साप बिनविषारी धामण असल्याची बतावणी करत बबलू काकडे परिसरात फिरला. केवळ फिरलाच नाही तर त्याने मण्यारला चक्क हातात घेऊन खिशात टाकण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी मोबाईल फोनमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला. मण्यार सापाशी खेळताचा बबलू काकडेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा बिनविषारी धामण जातीचा साप असल्याचं बबलू या व्हिडीओत लोकांना सांगत असल्याचंही दिसत आहे. 


उपचारादरम्यान बबलूचा मृत्यू
दरम्यान साडेतीन फुटाचा मण्यार हाताळताना बबलूला दंश देखील करायचा पण काहीच होत नाही, असंही तो लोकांना सांगत होता. अखेर रात्री आठ वाजता बबलूला उलटी झाल्याचं समजताच परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. बबलूवर त्वरित उपचार व्हावेत म्हणून धडपड केली, मात्र रात्री 11.30 वाजताच्या सुमारास बबलूचा मृत्यू झाला.


सापासोबत खेळणं अंगलट
खरंतर साप आढळल्याची माहिती किंवा सापाला पकडल्यानंतर बबलू काकडेने सर्पमित्रांना याची माहिती देणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करता तो सापाला घेऊन गावभर फिरत होता. यात आणखी भर म्हणजे आपण जो साप पकडला आहे, त्याच्याबद्दल त्याला योग्य माहिती नव्हती. धामण जातीचा साप पकडल्याचा त्याचा समज झाला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. परंतु हा मण्यार जातीचा साप होता, जो विषारी असतो. त्याच्या दंशामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. केवळ सापांबद्दलच्या अज्ञानामुळे बबलू काकडेचा मृत्यू झाला.


वर्ध्यात सापांबद्दलच्या अज्ञानामुळे याआधी दोन तरुणांचा मृत्यू 
दरम्यान सापांबद्दलच्या अज्ञानामुळे मृत्यू होण्याची वर्ध्यामधील ही पहिली घटना नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी वर्ध्यातील पिंपरी मेघे परिसरात दोन युवकांनी जीव गमावला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या दोन तरुणांनी कवड्या साप समजून मण्यार सापाला पकडलं. दोघेही मोटरसायकलवरुन बिनदिक्कतपणे सापाला घेऊन जात होते. यावेळी सापाने त्यांना दंश केला. विषारी सापाच्या दंशामुळे त्यांना त्रास होऊ लागला. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.  तर आता प्रशांत उर्फ बबलू काकडेला सापांबाबतच्या अज्ञानामुळे जीव गमवावा लागला.