Wardha Latest Crime News : चोरटे चोरी करण्यासाठी कोणत्या प्रकारची शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार आज सकाळी वर्ध्यामध्ये उघडकीस आला. येथील जामठा नजिक घडलेल्या एका अपघातानंतर चोरांची चोरी उघडकीस आली. चोरी केलेल्या बैलांच्या तस्करीसाठी चक्क स्कार्पिओ सारख्या चारचाकी वाहनाचा वापर चोरट्यांकडून करण्यात आला. मात्र "त्या" स्कार्पिओचा टायर फुटला आणि बैल चोरट्यांचे बिंग उघडे पडले. बैलांचे पाय दोरी आणि टायरच्या माध्यमातून बांधून गाडीत कोंबले होते. सिंदि रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी बैलांची चोरी केली होती. 


सिंदी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेलडोह व आसोला परिसरातील तीन बैल चोरट्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरले. यात सेलडोह येथील धिरज लाडीस्कर यांचे दोन तर आसोला येथील गणपत सहारे यांच्या एका बैलाचा समावेश आहे. चोरी केलेल्या बैलांची तस्करी करण्यासाठी चोरट्यांनी चक्क स्कार्पिओचा वापर केला. तीनही बैलांचे पाय दोर तसेच टायरच्या माध्यमातून बांधून कसेबसे त्यांना स्कार्पिओत कोंबण्यात आले.  आसोला येथील एक बैल गाडीत न सामावल्याने चोरट्यांनी तसाच सोडून दिला व तीन बैलांना घेऊन पळ काढला. मात्र सदर वाहनात वजन जास्त झाल्याने पहाटेच्या सुमारास त्या वाहनाचा जामठा नजिक टायर फुटला आणि ते वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले.
  
चोरटे सदर बैलांची चोरी केल्यानंतर नागपुरच्या दिशेने जात होते. त्यावेळी गाडीचा अपघात झाला आणि बैल चोरांचे बिंग फुटले. सदर अपघातात वाहनाचे तर नुकसान झालेच, याशिवाय सहारे यांच्या बैलालाही गंभीर इजा झाली. सदर बैल चोरीची घटना लक्षात येताच यासंदर्भातील वार्ता वर्धामध्ये सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पहाटे जामठा नजिक बैल घेऊन जाणारी स्कार्पिओ पलटल्याची माहिती मिळताच धिरज लाडीस्कर यांच्यासह कान्हा धोंगडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून बैल ताब्यात घेतले. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.  बैल चोरीच्या प्रकरामुळे वर्ध्यामध्ये एकच खळबळ माजली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.