Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसानं अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोनोरा ढोक या गावात मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं गावालगतच्या लाडकी नदीचा प्रवाह वाढून, नदीचे पाणी घरात शिरले आहे. यामुळं अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळं नदीचं पाणी सोनोरा ढोक गावात शिरलं आहे. या गावातील लेंडी नाला, खोलाड नाला तसेच लाडकी नदीचे पाणी एकत्र गावतील घरात शिरले आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्यानं सर्वात आधी लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला व जनावरांना सुरक्षित ठीकाणी हलवण्यात येत आहे. अजुनही पुराचे पाणी ओसरले नाही.
नाल्या काठच्या घरांची पडझड
ग्रामीण भागातील घरं ही साधी असून, पुराचा प्रवाह सोसणारी नाहीत. त्यामुळं नालाच्या काठी असलेली घर कोसळत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं अनेक कुटुंब हे उघड्यावर आली आहेत. या नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
पूर परिस्थितीमुळे गावकरी संतप्त
मागील काही वर्षांपासून लेंडी नाला हा विषय गावकऱ्यांसाठी अत्यंत डोकेदुखीचा ठरत आहे. गावाला विळखा घालून असणाऱ्या या नाल्यामुळं दरवर्षी गावात पूर येतो. गावातील नेते पुढारी मंडळी नेहमी पावसाळा आला की अनेक आश्वासन देतात. पंरतू कित्येक वर्षांपासून गावची परिस्थिति तशीच असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटला असून, काही घरांची पडझड झाली आहे. पुराच्या पाण्यात तीन बकऱ्या वाहून गेल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंब ही रोज मजुरी करुन आपले पोट भरणारी आहेत. नित्यनेमाची काम सुरु असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसानं सोनोरा ढोक गावात पुराचे पाणी शिरल्याने स्वयंपाक तरी कसा करावा आणि भूक कशी भागवायची हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरात आणि घराच्या चारही बाजूंनी पुरानं वेढा दिला असून नागरिकांना काहीच सुचेनासे झाले आहे. या नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : कोकणसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी, काही ठिकाणी पिकांना फटका
- Pune News: सॅल्यूट! वाहून जाणारा तरुण पाहताच पोलिसाने स्वत: उडी घेत वाचवला जीव; संपुर्ण थरार कॅमेऱ्यात कैद