Wardha News : वर्धा जिल्ह्यात येत्या दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी 9 ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Election) निवडणूक होणार आहे. त्यातील आर्वी तालुक्यातील 7 ग्रामपंचायत तर वर्धा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आता वर्धा जिल्ह्यात निवडणूक लढवणाऱ्या एकूण 9 ग्रामपंचायतींमध्ये वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर), बोरगाव नांदोरा आणि आर्वी तालुक्यातील अहिरवाडा, सर्कसपूर, पिपरी (पुनवर्सन) , मिर्झापुर, मांडला, जाम (पुनर्वसन) , हैबतपुर (पुनर्वसन) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
यंदा जनतेतून ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदाचीही निवड होणार असल्याने त्याकरीता देखील मतदान होणार आहे. 9 सरपंच पदाकरीता 27 उमेदवार मैदानात आहे. तर 147 उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता रिंगणात आहेत. तर आर्वी तालुक्यातील 8 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा दिसून येणार आहे. या निवडणुकांकडे जिल्ह्यातील नेत्यांचं देखील लक्ष लागून आहे.
एकूण किती आहेत मतदार?
16 ऑक्टोबरला जिल्ह्यात होऊ घातलेल्या 9 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकूण 10 हजार 818 मतदार आहेत. तर यातील आर्वी तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मधील एकूण चार हजार 481 मतदार आहेत. तर वर्धा तालुक्यातील 2 ग्रामपंचायत मध्ये 6 हजार 337 मतदार आहेत.
उमेदवारांची गड जिंकण्याची तयारी जोरात
आर्वी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमधील 5 ग्रामपंचायती या भाजपच्या तर 2 कॉंग्रेसच्या आहेत. यात भाजपचे आमदार दादाराव केचे यांचा गट आणि काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या गटात चुरशीची लढत बघायला मिळणार आहे..तसेच सालोड हिरापूर ग्रामपंचायत मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लढत असून सरपंच पदापेक्षा ग्रामपंचायत सदस्यांची लढत जास्त चुरशीची समजली जातेय.कारण एकाच वॉर्ड मधील 2 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहे विशेष म्हणजे दोघेही आपापल्या पक्षातील पदाधिकारी आहेत तर दोघांमधील राष्ट्रवादीचा उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे.
भेटीगाठी अन् आश्वासनांचा पाऊस
9 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे..गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू असून आश्वासनांचा पाऊस पडताना बघायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या