Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (96 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) आज सांगता झाली. संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या संमेलानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचं उत्तम आयोजन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात वर्धा प्रशासनानं केलं. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच आयोजकांचं कौतुक केलं. 


वर्धा येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले खरे, परंतु या साहित्य संमेलनाला साहित्यिक प्रेमींनी मात्र म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र होतं.  3 फेब्रुवारी रोजी परंपरागत ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती . या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, झांशीची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर टेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले.  


काल संमलेनात नागराज मंजुळे, किशोर कदम, सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांची मुलाखत बालाजी सुतार यांनी घेतली होती. यावेळी प्रांगण ओसंडून वाहिलेलं दिसून आलं. 


साहित्य संमेलनाला प्रतिसाद कमी


96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. संमेलनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी देखील आचार्य विनोबा भावे या मुख्य सभागृहासह इतर सभागृहात उपस्थितांची संख्या अतीशय कमी होती. पहिल्या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना देखील मुख्य सभागृहात 90% खुर्च्या रिकाम्या होत्या. दुसऱ्या दिवशीही फारशी स्थिती बदललेली नव्हती. त्यामुळे साहित्य संमेलन सरकारी अनुदानावर चालणारी सहल बनले आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.