Dhananjay Mahadik on Satej Patil : काँग्रेसकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही, काल झालेल्या सभेमध्ये विश्वजित कदम यांनी मी जर बंटी पाटलांसारखा वागलो, तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही अशी सांगितले, यावरून बंटी पाटील किती खूनशी आहेत हे दिसून येतं. मित्र पक्षांना कशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करतात हे दिसून येतं, असा हल्लाबोल खासदार धनंजय महाडिक यांना केला.
त्यांनी फक्त दोन मेहरबाण्या केल्या आहेत
आज (17 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना खासदार महाडिक यांनी सतेज पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्यासाठी कारणीभूत बंटी पाटील आहेत. गेली पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यामध्ये महापालिका होती, चार आमदार होते तरीही विकासकामे झाली नसल्याची टीका त्यांनी केली. त्यांनी फक्त दोन मेहरबाण्या केल्या आहेत. आयआरबी टोल आणि थेट पाईपलाईनचं काम केलं असल्याचे ते म्हणाले. मात्र आमदार खासदार टोलमाफी असतानाही टोल पावती फाडून टोल समर्थन करून एक प्रकारे त्यांनी सूर्याजी पिसाळ असल्याचे सिद्ध केल्याची टीका सुद्धा धनंजय महाडिक यांनी केली.
तर निवडणूक लढणार नाही असेही म्हटले होते
14 वर्षांपूर्वी त्यांनी याच मैदानावर अडीच वर्षात जर थेट पाईपलाईनचे पाणी आणलं नाही, तर निवडणूक लढणार नाही असेही म्हटले होते. मात्र त्यांनी त्यानंतर दोन-तीन निवडणूक लढवल्याची टीका त्यांनी केली. गेल्या वर्षी त्यांनी एकट्यानेच थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ केली, पण जनतेला पाणी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसताना सुद्धा एकट्यानेच आंघोळ केल्याची टीका त्यांनी केली. महायुती आणि केंद्र सरकारच्या योजना असतानाही श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याची टीकाही धनंजय महाडिक यांनी केली.
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही
दरम्यान, लाडकी बहिणींना धमकावून अडचणीत सापडलेल्या महाडिक यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण बाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी तातडीने बहिणींची माफी मागितली, पण सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेला ज्या शब्दात बोलले त्यावर त्यांनी माफी मागितली नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत जाऊन सांगत आहेत, की मुन्ना महाडिक यांचा हात तोडा, पाय तोडा असं म्हणतात. उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो, मला तुमचा अवमान करायचा नाही, पण मी सांगतो मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. उद्धव साहेब आपल्या भाषणाचा कोणतरी गैरफायदा घेतील म्हणून आज हे मला बोलावं लागतं, असे महाडिक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या