नवी दिल्ली: वेस्टइंडिजसोबत सेमीफायनलमध्ये हरल्यानंतर भारत टी-20 विश्वषचषकातून बाहेर पडलं असलं तरी या दरम्यान, विराट कोहलीचा एक फोटो खूपच व्हायरल झाला. या फोटोमध्ये विराट कोहलीसोबत आशिष नेहरा दिसतो आहे. जो विराटला अवॉर्ड देतोय. पण या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊयात.


 

या फोटोमध्ये टी-२० क्रिकेटचा क्रमांक एकचा फलंदाज विराट कोहली आणि टीम इंडियाचा सीनियर गोलंदाज आशिष नेहरा दिसत आहेत. विश्वचषकात विराट कोहलीच्या कामगिरीची बरीच चर्चा झाली. त्याचवेळी याच संघात आशिष नेहराही होता. त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.

 

एबीपी न्यूजनं या फोटोचा खरेपणा तपासल्यानंतर याबाबत फारच रोचक माहिती समोर आली. आजपासून 13 वर्षापूर्वी म्हणजेच 2003 साली अंडर 16च्या एका सामन्यात चांगलं प्रदर्शन करणाऱ्या विराट कोहलीला आशिष नेहराच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं.

 

2003 साली दिल्लीच्या हरिनगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एक टुर्नामेंट झाली होती. त्यावेळी विराट फक्त 15 वर्षाचा होता. तर तेव्हा आशिष 1999 च्या टीम इंडियाचा भाग होता आणि संघात आपलं स्थान पक्कं करण्याचं प्रयत्न नेहरा करीत होता.

 

विराट कोहली सध्या टी-20 मधील नंबर एकचा फलंदाज आहे. तसंच कसोटी टीमचा कर्णधारही आहे. आशिष नेहरा कसोटी क्रिकेट खेळत नसला तरीही स्थानिक क्रिेकेट खेळताना दिल्लीच्या संघाचा विराट कर्णधार होता. त्यावेळी नेहरा त्याच्या संघात होता.

 

सध्या विराट कोहली यशाचा शिखरावर आहे. तर 36 वर्षीय आशिष नेहरानं टीम इंडियामध्ये सीनियर गोलंदाज म्हणून तब्बल 5 वर्षानं पुनरागमन केलं आहे. विराट आणि नेहरा हे दोघेही 2011च्या विश्वचषकातील विजयी संघातील सदस्य होते.

 

त्यामुळे हा व्हायरल झालेला फोटो खरा आहे.