Nashik Weather Update नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. सोमवारी नाशिकला 11.1 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांनी थंडीपासून (Cold) बचावासाठी उबदार कपडे परिधान केल्याचे चित्र आहे. तसेच, रविवारी कमाल 30.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे.    


ढगाळ हवामान पाऊस दाट धुके अन आता अचानकपणे घसरलेले तपमान यामुळे द्राक्ष पंढरी निफाड (Niphad) गारठली आहे. सोमवार दि. १५ रोजी कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात पारा ६.५ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे. पारा घसरल्याने अनेकांनी शेकोट्या पेटवल्याचे दिसून येत आहे. निफाडला यंदाच्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.   


द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार


पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. याचा प्रतवारीवर परिणाम होतो तर परिपक्व द्राक्षमणी हे तडकण्याचा धोका आहे. चालु द्राक्ष हंगाम हा अखेरच्या टप्यात संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच जिल्ह्यात दोन वेळेस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. आता पारा घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 


पुढील 48 तासात तापमानात घट होणार


मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. राजस्थान, दिल्लीमध्ये थंडीची स्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


अनेक भागात थंडीचा कडाका


उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानात घट झाल्याचे चित्र आहे.  जळगावात किमान तापमान ९.९ अंशांवर पोहोचले आहे, तर अहमदनगरमध्ये ११.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातदेखील तापमान १२.२ अंशांपर्यंत खाली उतरलं, महाबळेश्वरात किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस तर बारामतीत तापमान १२.१ अंशांवर आहे. संभाजीनगरमध्ये किमान तापमान १०.२ अंशांवर, नांदेड १५.४, परभणी १४.६ तर उदगीरमध्ये १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम विदर्भातील वाशिम ११.४, यवतमाळ १२, बुलढाणा १२.२, अमरावती १२.५ आणि अकोल्यात १३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. 


आणखी वाचा


Nashik News : मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला नाशकात दुर्दैवी घटना; तारांवर अडकलेली पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू