Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. तर अनेक ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. अशातच पूर्व विदर्भाला (Vidarbha Weather) गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पुन्हा एकदा अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया चंद्रपुर गडचिरोली जिल्ह्यात काल (4 मे) पुन्हा वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. अचानक आलेला अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. वादळी वाऱ्यासह गारपीटीनं भातपीक जमीन दोस्त झाल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे. तर अनेकांच्या घरावरील छत वादळी वाऱ्यात अक्षरक्ष: उडाली असल्याने मोठं नुकसान नागरिकांचे झाले आहे.
शेतकऱ्यांचं उन्हाळी भातपीक जमीनदोस्त
मागील सहा दिवसांपासून भंडाऱ्यात वादळीवारा आणि गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळामुळं हातातोंडाशी आलेलं अनेक शेतकऱ्यांचं उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झालेलं आहे. वादळी वारा आणि गारपीटमुळं भातपिकाची लोंबी गळाली असून शेतशिवारामध्ये पाणी साचलेलं आहे. यामुळं भात पिकाचं उत्पादन घटणार आहे. या सोबतचं बागायती शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. महसूल विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
वादळी वाऱ्याचा तडाखा! झाडं उन्मळून पडली, अनेक घरांवरील छत उडून गेली
दरम्यान, काल (4 मे) सायंकाळी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाचा गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंबा पिक गळून पडलं आहे. आमगाव तालुक्यातील वळद येथील एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेतील 80 टक्के आंबे हे कालच्या वादळी वाऱ्यामुळे गळून पडलेले आहेत. तर दुसरीकडे गोंदिया तालुक्याच्या खातीया येथे विजेचे खांब देखील पडले असून अनेक घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे एकंदरीत या वादळी वाऱ्याचा तडाखा गोंदिया जिल्ह्याला सर्वत्रच बसला असून अनेकांचे यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून आता केली जात आहे.
भंडाऱ्यात वीज पडून एका इसमासह तीन जनावरांचा मृत्यू
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली. यात वीज कोसळून भंडारा जिल्ह्यात तीन पाळीव जनावर आणि एका इसमाचा मृत्यू झाला. भंडारा तालुक्यातील तिड्डी येथील रवींद्र खंगार (४०) यांचा मृत्यू झाला. तर, तुमसर तालुक्यातील दोन तर, साकोली तालुक्यातील एका पशुपालकांच्या जनावरांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या