जळगाव : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. अशातच न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा संसदेने याबाबत कृती केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली आहे. ते जळगाव येथे बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायधीश यशवंत वर्मा यांच्याबाबत झालेला प्रकार हा वेबसाईटवर प्रसिद्ध केले या सर्वोच्च न्यायालयाच्या कृतीचं ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी अभिनंदन केलंय. न्यायालयावरचा सामान्य माणसाचा विश्वास कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते. आजही सामान्य माणसाच्या आशेचे किरण ही न्यायपालिका व न्यायव्यवस्था आहे. असेही उज्वल निकम म्हणाले.
न्यायपालिकेने एक आदर्श घालून द्यावा- उज्वल निकम
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून 15 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे अंतर्गत चौकशी अहवाल सादर केला. मात्र न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी ती रक्कम माझी नाही हे स्पष्ट केलं असलं तरी यासाठी पोलीस तपास व न्यायालयीन चौकशीसाठी वेळ लागू शकतो. आणि त्यामुळे लोकांच्या मनात शंका उभी राहू शकते, त्यामुळे न्यायपालिकेने एक आदर्श घालून दिला पाहिजे, अशी अपेक्षा ही उज्वल निकम यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या नावलौकिकाला कुठेही गालबोट लागता कामा नये- उज्वल निकम
नागपूर हिंसाचाराची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. नागपूर हिंसाचारात ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेलं आहे, त्या दंगेखोरांकडून त्यांच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरपाई ही आरोपींच्या मालमत्तेतून वसूल करण्याचा कायद्यात अधिकार आहे. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. महाराष्ट्र आदेशात एक चांगलं राज्य आहे. मात्र काही विकृतीमुळे असे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्राच्या नावलौकिकाला कुठेही गालबोट लागता कामा नये. अशी अपेक्षा ही उज्वल निकम यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या