नाशिक/शहापूर : राज्यात खळबळजनक पद्धतीने सत्तास्थापना झाल्यानंतर आता आकड्यांचा गेम सुरु झाला आहे. यामध्ये आता सरकार वाचवण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आहे. यामुळे आमदार फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे.


एकीकडे काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीला 15 आमदारांनी हजेरी लावल्याचं कळालं. पण त्यातले दोन आमदार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता असल्याची तक्रार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे तर तिकडे नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सकाळी पक्ष मिटिंगसाठी जातो असे सांगून गेले ते परतले नाहीत. त्यांच्याशी 10 ते 15 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांच्या मुलाने दिली आहे. त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नाहीये. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली आहे, असे त्याने सांगितले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

आमदार दरोडा यांचा मुलगा करण दरोडा याने सांगितले की, माझ्या वडिलांना रात्री अजितदादांनी बोलावले आहे असा फोन आला. आम्ही रात्री अडीच वाजेपर्यंत मुंबईत आलो. मी आणि माझे वडील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यापर्यंत सोबत होतो. त्यानंतर ते एका गाडीत बसून निघाले. मी त्यांच्या गाडीच्या मागे गेलो. राजभवनापर्यंत मी त्यांच्या पाठीमागे गेलो. मात्र मला राजभवनात प्रवेश नसल्याने मी बाहेर थांबलो. त्यानंतर माझा आणि माझ्या वडिलांचा संपर्क होत नाही, असे दरोडा यांच्या मुलगा करणने एबीपी माझाला सांगितलं.

दरम्यान शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचा मुक्कामही आता हॉटेलमध्ये हलवण्यात आला आहे. रात्री 9.30 च्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीची बैठक संपल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेल रेनिसान्समध्ये ठेवण्यात आलंय. तर शिवसेना आमदारांचाही हॉटेल ललितमधला मुक्काम वाढवण्यात आलाय. आणि काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला सुरक्षितस्थळी नेण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाणांनी दिली..