मुंबई : राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे कट पुन्हा एकदा उघड झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या शस्त्रास्त्रांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान हे दहशतवादी देवबंद येथे ही गेले होते आणि नेपाळमार्गे पाकिस्तानमध्ये विशेष दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार होते अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलवरून अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी दिल्ली एनसीआर हादरवण्याच्या उद्देशाने येथे आले होते. परंतु दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला त्यांच्याविषयी वेळेत माहिती मिळाली आणि त्यांना दिल्लीतील मिलेनियम पार्क जवळून अटक करण्यात आली. अब्दुल लतीफ आणि मोहम्मद असलम अशी दोघांची नावे असून ते दोघे जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि बारामुल्ला भागातील रहिवासी आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी हे दोघेही सोशल नेटवर्क्सच्या माध्यमातून जैश ए मोहम्मदसारख्या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते त्यांच्या घरातून पळून गेले होते. तर असाही आरोप आहे की या दोघांनी जम्मू-काश्मीर आणि आसपासच्या परिसरात काही दहशतवादी कारवायांमध्येही भाग घेतला होता. आता या दोन दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनवरून ते पाकिस्तानात जाण्याचा विचार करत होते असा खुलासा झाला आहे.


दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलवरून अनेक खुलासे झाले आहेत. जेथे एकीकडे जैशचा सर्वेसर्वा मसूद अझरचा व्हिडीओ सापडला आहे. तर दुसरीकडे त्याचं आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले महत्त्वाचे निर्देश आणि सूचनाही सापडल्या आहेत. त्याबाबत पोलीस चौकशी करत असून त्यांचा हेतू काय होता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


दहशतवादाचे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी हे पाकिस्तानमध्ये जाणार होते आणि त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवरुन बर्‍याचदा प्रयत्न केला पण सीमेवर कडक बंदोबस्तामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आतापर्यंत झालेल्या चौकशीदरम्यान हे समजले आहे. पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरने त्यांना दिल्ली येथे पाठवले होते. प्रारंभिक चौकशी दरम्यान हे लोक सहारनपूर आणि देवबंद येथे गेले होते. आता तेथे कोणास भेटले आणि तेथून काही सूचनाही त्यांना मिळाल्या आहेत की नाही हे विशेष कक्षाला जाणून घ्यायचे आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि भारताच्या देवबंद यांच्यात परस्पर संबंध काय आहे आणि जैश ए मोहम्मदकडे येणारा प्रत्येक दहशतवादी देवबंदला का जातो? देवबंदमध्ये एकमताने दहशतवादाला विरोध केला आहे. अशा परिस्थितीत गुप्तचर यंत्रणांनी आता तेथे दहशतवादी कोणाला भेटायला जातात याचा शोध सुरू केला आहे.


दिल्लीत अटक करण्यात आलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर केले. स्पेशल सेल चौकशीसाठी रिमांड घेणार आहे. आता दिल्ली पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की दिल्ली एनसीआरच्या कोणत्या भागात व कोणत्या व्हीआयपींना लक्ष्य केले जाणार होते आणि ते दिल्ली आणि आसपासच्या।परिसरात कोणाच्या संपर्कात होते? तसेच जे लोक दिल्ली ते नेपाळपर्यंत या लोकांना जाण्यासाठी मदत करणार होते ते कोण आहेत? या दोघांच्या चौकशीत बरेच खुलासे होऊ शकतात.