Tuljapur News धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani Temple) मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातील शिळांना गेलेले तडे आणि सद्यस्थितीच्या केलेल्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपवला आहे. याच अनुषंगाने लवकरात लवकर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाला जिल्हा प्रशासनाने साद घातली आहे. आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे.

भाजप आणि आव्हाड समर्थकांमध्ये चांगलीच झटपट, पोलिसांना मध्यस्थी

दरम्यान, आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य शिखर हटविण्याच्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतल्याने तुळजापुरात चांगलाच राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखराला हात लावू न देण्याची भूमिका व्यक्त केल्यानंतर भाजप आणि आव्हाड समर्थकांमध्ये चांगलीच झटपट झाली. झटपट एवढी वाढली होती की अक्षरशः पोलिसांना मध्यस्थी करत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीला वाट करून द्यावी लागली. दुसरीकडे मंदिराबाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शिखरासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थान अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिलीय.

कोणत्याही परिस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही- जितेंद्र आव्हाड

तुळजाभवानी मंदिराची पाहणी करून जितेंद्र आव्हाड यांनी आपली मंदिराच्या विकासाबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली . यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाला विरोध नाही, तर ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मंदिरातील वास्तु हलवू देणार नाही, असा इशारा दिला. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर संतप्त भाषेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मंदिराबाहेर आव्हाडांची गाडी अडवली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्म आणि देवीचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तुळजाभवानी मंदिर परिसरात यावेळी वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ तणावाची परिस्थिती होती. भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडी अडवल्यानंतर आव्हाड समर्थक ही भिडले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही बाजूच्या समर्थकांना शांत केलं. मात्र तुळजाभवानी मंदिरासमोरील गोंधळाबाबत पोलीस प्रशासन कारवाईच्या तयारीत बघायला मिळाले.

आणखी वाचा