Tuljapur Temple धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) चक्क उंदरांनी धुमाकूळ घातला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मंदिर बंद केल्यावर उंदरांनी थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेशकेल्याचे दिसून आलं आहे. तुळजाभवानी मातेचे ऑनलाइन दर्शनादरम्यान उंदरांचा संचार असल्याचं यात दिसून येत आहे. गुजरातच्या भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकांला ऑनलाइन दर्शनादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला असून त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उंदरांचा (Rats) तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी हि त्यांनी केली आहे.
उंदरामुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचा नुकसान होण्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाइन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे. या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकाराचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वेळीच या उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. परिणामी मंदिर प्रशासन यावर नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रसिद्ध राजुरेश्वर गणपतीला अंगारक संकष्ट चतुर्थी निमित मोठी गर्दी
श्रावण मासातील अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त राज्यभरात गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या जालन्यातील राजुर गणपतीला रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झालीय. गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून राजूरच्या राजुरेश्वर गणपतीची ओळख आहे. नवसाला पावणारा आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारा बाप्पा म्हणून श्रद्धाळूंमध्ये या गणपतीला विशेष मान आहे.
गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख
श्रावणमास आणि आजच्या अंगारकी चतुर्थीचा शुभमुहूर्त साधत भाविक श्री गणेशाच्या नावाचा जयघोष करत दर्शन घेत आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा विविध भागांतून श्रद्धाळू येथे दाखल झाले असून मध्यरात्री 12 वाजता विशेष आरती झाल्यानंतर भाविकांकडून दर्शनाला सुरुवात झाली. आज सकाळी देखील राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा