Weird News: ह्रदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण सध्या झपाट्याने वाढत आहे. कुणाला जिम करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो, तर कुणाला लग्नाच्या वरातीत नाचताना. दिवसेंदिवस वाढत असलेल्या हृदयविकाराच्या घटनांनी सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. कारण या आजारात अनेकांचा उपचारापूर्वीच मृत्यू होतो. लिथुआनिया (Lithuania) देशातील एका व्यक्तीने मात्र या आजाराचं नाटक करुन स्वत:चा स्वार्थ साधला आणि अनेकांना वेड्यात काढलं.


आजारी पडल्याचं नाटक करुन टाळायचा बिल


लिथुआनियातील या व्यक्तीने आजाराच्या बहाण्याने एक-दोन नव्हे, तर एकूण 20 रेस्टॉरंटची फसवणूक केली. या लिथुआनियन  व्यक्तीचं नाव एडास आहे, ज्याचं वय 50 वर्षं आहे, ही व्यक्ती एलिकॅन्टे येथे राहते. इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, एडासने 20 रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं, पण कधीही बिल भरलं नाही. बिल भरणं टाळण्यासाठी त्याने नामी शक्कल लढवली. हे जाणून घेतल्यानंतर एवढं मोठं नाटक कोणी कसं करू शकतं? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.


हार्ट अटॅक आल्याचं करायचा नाटक


हा माणूस ज्याही रेस्टॉरंटमध्ये जायचा, तिथे तो त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ ऑर्डर करायचा. मस्त बसून दारू ढोसायचा, अनेक ग्लास व्हिस्की प्यायचा आणि शेवटी डेजर्टही खायचा. एवढं खाऊन झाल्यावर जेव्हा त्याला बिल दिलं जायचं, तेव्हा तो छातीवर हात ठेवून त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचं नाटक करायचा. रेस्टॉरंटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचं नाटक करत असताना तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळायचा. यानंतर सगळ्यांना वाटायचं त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि मग ते त्याला रुग्णालयात न्यायचे.


सूटाबूटात रेस्टॉरंटमध्ये जायचा


एडास हा नेहमी डिझायनर कपडे घालूनच रेस्टॉरंटमध्ये जायचा, जणू काही तो खूप श्रीमंत आहे, असं तो भासवायचा. तो स्वत:ला रशियन पर्यटक म्हणायचा आणि अनेक भाषांच्या मिश्रणात बोलत असायचा. मेनू विचारल्यावर तो एकाच वेळी अनेक खाद्यपदार्थ ऑर्डर करायचा. बिल आलं की बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळायचा. एडासने हेच नाटक एका वर्षात 20 वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये केलं.


अन् झाली पोलखोल... नंतर बेड्या


एडास एकदा बुएन कोमर रेस्टॉरंटमध्ये जेवायला आला, त्यावेळी मात्र त्याला आजारी पडण्याचं नाटक करता आलं नाही. मग त्याने तिथून पळ काढला. या रेस्टॉरंटचे मॅनेजर मॉइसेस डोमेनेच यांनी बिल न भरता पळून जात असलेल्या एडासला पकडलं आणि पोलिसांना बोलावलं. यानंतर कोर्टाचे समन्स आणि दंड याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे एडासला आता अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा:


Starbucks: स्टारबक्सने कामावरुन काढलं; कर्मचाऱ्याने रागाच्या भरात सिक्रेट रेसिपी केल्या जगजाहीर