Valentines Day 2023 : आज जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात. हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी जगभरात लाखो लोक कार्ड, फुलं, चॉकलेट्स देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. दरवर्षी जगभरात सुमारे 1 अब्ज व्हॅलेंटाईन डे कार्डची देवाणघेवाण होते. या दिवशी 37 टक्के पुरुष आणि सुमारे 27 टक्के महिला त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी फुलं खरेदी करतात. या दिवशी चॉकलेटचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो आणि याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?


पहिला व्हॅलेंटाईन डे कधी साजरा करण्यात आला?


प्रचलित माहितीनुसार, पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता, ही परंपरा आजतागायत कायम आहे. आजही 14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पण त्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हलने झाली. पाचव्या शतकाच्या अखेरीस, पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. रोमन लोकांसाठी हा एक सण मानला जातो. या दिवशी सामूहिक विवाह देखील होतात.


व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो?


'ऑरिया ऑफ जेकोबस डी वराजिन' या पुस्तकात व्हॅलेंटाईन डेची कहाणी आहे. यानुसार या प्रेमाच्या दिवसाला रोमच्या धर्मगुरू 'सेंट व्हॅलेंटाइन' यांचं नाव देण्यात आलं आहे. इसवी 270 मध्ये संत व्हॅलेंटाईन होऊन गेले. संत व्हॅलेंटाईन हे जगभरात प्रेमाचा संदेश देण्यासाठी ओळखले जातात. पण, त्यावेळी रोम राजा क्लॉडियस प्रेमाच्या विरोधात होता. प्रेम आणि प्रेमविवाहावर त्याचा विश्वास नव्हता. राजा क्लॉडियसच्या मते, प्रेम आणि प्रेमविवाहाबाबत हे सैनिकांचं लक्ष विचलित होण्याचं कारण आहे. त्यामुळे लोकांना सैन्यात भरती होण्याची इच्छा नाही. यामुळेच क्लॉडियसने विचित्र नियम लागू केला. राजा क्लॉडियसने रोममध्ये सैनिकांच्या लग्नावर बंदी घातली होती.


संत व्हॅलेंटाईन यांचा विवाह बंदीविरोधात निषेध


संत व्हॅलेंटाईन यांनी याबाबत विवाह बंदीचा उघडपणे विरोध केला आणि निदर्शनं केली. संत व्हॅलेंटाईनने रोमच्या राजाच्या विरोधात जाऊन संपूर्ण शहरात अनेक जोडप्यांचं लग्न लावून दिलं. राजाला ही बाब कळताच त्याने संत व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली. 14 फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईनला फासावर चढवण्यात आलं. 


प्रेमासाठी अमर संत व्हॅलेंटाईन


संत व्हॅलेंटाईनने फाशीपूर्वी जेलरच्या मुलीला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये संत व्हॅलेंटाईनने लिहिलं की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे डोळे जेलरच्या अंध मुलीला देण्याची त्यांची इच्छा आहे. संत व्हॅलेंटाईन यांनी फाशीची शिक्षा झाली, पण प्रेम करणाऱ्यासाठी ते अमर झाले. यानंतर संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या नावाने 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो आणि याला प्रेमाचा दिवस असंही म्हणतात.