Strawberry Moon 2022 : चंद्र (Moon) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. चंद्र त्याच्या कक्षेत सर्वात जवळ किंवा दूर असणे याला 'अप्सिस' (Apsis) असं म्हणतात. चंद्र पृश्वीभोवती (Earth) त्याच्या कक्षेत जवळ आला तर तो आकाराने मोठा दिसतो. याउलट चंद्र पृश्वीभोवती त्याच्या कक्षेत दूर गेला तर तो आकाराने लहान दिसतो. आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा करताना कक्षेत सर्वात जवळ येईल. 14 जून 2022 रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल, त्यामुळे आकाराने मोठा दिसेल. याला सूपरमून किंवा स्ट्राबेरी मून असंही म्हणता येईल.
आज पृथ्वीवरील लोकांसाठी चंद्र फारच तेजस्वी आणि मोठा दिसेल. आकाश निरभ्र असेल तर तुम्हाला आकाशातील चंद्राचं सुंदर रुप पाहायला मिळेल. सूर्यास्तानंतर आग्नेय दिशेकडून चंद्र म्हणजेच 'स्ट्रॉबेरी मून' उदयास येईल. हा आकाराने दिसायला मोठा आणि अतिशय तेजस्वी असेल. तज्ज्ञांच्या मते, 14 जूनच्या संध्याकाळी 5:22 वाजता आकाशात सुंदर 'स्ट्रॉबेरी मून' पाहता येईल. यावेळी तेजस्वी चंद्राचं लोभस रुप पाहता येईल.
'स्ट्रॉबेरी मून' म्हणजे काय?
'स्ट्रॉबेरी मून' या नावावरून चंद्र गुलाबी रंगाचा दिसेल असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. या दिवशी चंद्र स्ट्रॉबेरीसारखा दिसत नाही किंवा त्याचा रंग गुलाबीही नाही. हे नाव मूळ अमेरिकन लोकांनी पौर्णिमेला दिलं होतं. द ओल्ड फार्मर्स अल्मॅनॅकच्या मते, स्ट्रॉबेरी मून हे नावअल्गोनक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा लोकांद्वारे पहिल्यांदा वापरण्यात आलं होतं. कारण जूनमध्ये स्ट्रॉबेरीची कापणी केली जाते तेव्हा पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला 'स्ट्रॉबेरी मून' असं संबोधलं गेल्याचा अंदाज आहे.
हिंदू धर्मानुसार आज वटपौर्णिमा
हिंदू धर्मानुासर जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच आज 14 जून 2022 रोजी आहे. आज वटपौर्णिमा आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला.