Singapore's Enabling Village: सरकते दरवाजे आणि विस्तीर्ण वाट असलेले सुपरमार्केट, व्हीलचेअर्स असलेली शॉपिंग ट्रॉली, वॉशरूमच्या दारावर ब्रेल अक्षरे आणि प्रत्येक मजल्यावर असलेले संकेतं आणि चिन्हं ही सिंगापूरमधील एका अनोख्या गावाची वैशिष्ट्ये आहेत. आता या सगळ्या गोष्टी कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर सिंगापूरमध्ये दिव्यांग नागरिकांना समाजात वावरताना अडचणी येऊ नयेत, त्यांनाही सामान्य नागरिकांप्रमाणे सुलभतेनं जगता यावं यासाठी तिथल्या सरकारने ही पाऊलं उचलली आहेत. या गावाचं नाव आहे 'एनेबलिंग व्हिलेज' (Enabling Village), याला ईव्ही असंही म्हटलं जात. ही सर्वसमावेशक आणि संवेदनाक्षम-अनुकूल जागा आहे, जिथं दिव्यांग नागरिक एकत्रितपणे आनंदाने आपलं जीवन जगू शकतात. या गावाला अशा प्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे की, कोणतीही दिव्यांग व्यक्ती येथे सहज वावरू शकते आणि जगण्याचा आनंद घेऊ शकते. दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक काम करताना अगदी सहज वाटावं म्हणून या गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  


याबद्दल माहिती देताना एसजी एनेबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कू जियोक बून यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे की, ''येथील व्यवसायिक आपल्याकडे दिव्यांग व्यक्तींना नोकरीवर ठेवतात आणि त्यांना कामाचं प्रशिक्षण देतात. यामध्ये हॉटेल्स, जीम यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे. येथे अपंग व्यक्तींच्या कामाचा सन्मान केला जातो.'' कू जियोक बून यांनी सांगितलं की, "आम्हाला आशा आहे की आमच्या सामूहिक प्रयत्नातून दिव्यांग व्यक्ती चांगले आणि अर्थपूर्ण जीवन जगतील. आम्ही अशा अधिक लोकांना चांगली देऊ शकतो आणि अधिक समावेशक समाज निर्माण करू शकतो.''


बून यांनी सांगितलं की, या गावात अपंग व्यक्तींसाठी अनेक प्रशिक्षण, करिअर मेळाव्यांचे आयोजन केले जाते. तसेच येथे अनेक रोजगार मेळावेही आयोजित केले जातात. ज्यात अनेकांना नोकरीची चांगली संधी मिळते. यात आम्ही त्यांना मुलाखतीच्या टिप्स देण्यासाठी  प्रशिक्षण कार्यशाळा देखील आयोजित करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही जागा विविध देशांतील पर्यटकांना आकर्षित करते, जे जगण्याच्या सामान संधीच्या शोधात असतात. बून यांनी सांगितले की, ''हे सक्षम गाव स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही अतिथींना सामावून घेतं. आम्ही सर्वांना प्रेरित करू इच्छितो आणि दाखवू इच्छितो की सक्षम तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक संस्कृती असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी समाज अधिक समावेशक कसा असू शकतो.''