Rashtrapati Bhavan: भारताचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती यांचे निवासस्थान म्हणजे राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan). राष्ट्रपती भवन हे नवी दिल्ली (New Delhi) येथे आहे. राष्ट्रपती भवन हे अतिशय सुंदर आणि भव्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्याची अनेकांची इच्छा असते. आता 1 डिसेंबरपासून राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस राष्ट्रपती भवन खुले असणार आहे. आठवड्यातील बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. राष्ट्रपती भवनामध्ये तुम्ही काय पाहू शकता? तसेच राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्यासाठी कशा प्रकारे बुकिंग करावे लागते? याबाबत जाणून घेऊयात...
राष्ट्रपती भवनामध्ये काय पाहावे?
दरबार हॉल- राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, खेलरत्न पुरस्कार हे पुरस्कार विविध व्यक्तींना प्रदान केले जातात. या पुरस्कारांच्या कार्यक्रमांचे आयोजन दरबार हॉल या सभागृहात केले जाते. या हॉलमध्ये 1500 वर्षे जुनी भगवान बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दरबार हॉलच्या अगदी समोर एक गेट देखील आहे. हे फक्त 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट सारख्या काही खास प्रसंगी उघडले जाते. या हॉलमध्ये एकावेळी 400 हून अधिक लोकांची बैठक व्यवस्था केली जाऊ शकते.
अशोका हॉल- राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिन केले जाते.
बँक्वेट हॉल- बँक्वेट हॉलमध्ये 100 हून अधिक लोकांची बैठक व्यवस्था केली जाऊ शकते. राष्ट्रपती इतर देशांतील प्रतिनिधींसोबत या सभागृहात जेवण करतात. या सभागृहाच्या दोन्ही भिंतींवर माजी राष्ट्रपतींची कॅनव्हासवर बनवलेली पोर्ट्रेट चित्रे आहेत. या चित्रांवर तीन प्रकारचे दिवे देखील आहेत. बँक्वेट हॉलच्या खिडकीतूनही तुम्ही मुघल गार्डन पाहू शकता.
मार्बल म्युझिक हॉल
राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूंची सजावट या सभागृहात करण्यात आली आहे. मार्बल म्युझियम हॉल 2016 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भेट देण्यासाठी आणि पाहण्यासाठी खुला केला होता. नॉर्थ ड्रॉइंग रुम, लाँग ड्रॉइंग रुम, भगवान बुद्धांची मूर्ती इत्यादी गोष्टीपण तुम्ही बघू शकता.
कसे करावे बुकिंग?
तुम्हालाही राष्ट्रपती भवनाला भेट द्यायची असेल, तर त्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. तुम्ही राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता. राष्ट्रपती भवन बुधवार ते रविवार आठवड्यातील पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. तुमच्याकडे पाचही दिवस सकाळी 10 आणि 11, दुपारी 12, संध्याकाळी 2 आणि 3 वाजता प्रत्येकी एक तासाच्या स्लॉटचा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि स्लॉटच्या उपलब्धतेनुसार दिवस आणि वेळ निवडून या भव्य इमारतीला भेट देऊ शकता.
23 हजार मजुरांनी काम केले
1913 मध्ये राष्ट्रपती भवन बांधण्याचे काम सुरु झाले होते. 17 वर्षात राष्ट्रपती भवन बांधकाम पूर्ण झाले. राष्ट्रपती भवन तयार करण्यासाठी सुमारे 23,000 मजुरांनी काम केले, त्यापैकी 6,000 मजूर केवळ दगडांवरील कोरीव काम करणारे होते. वास्तुविशारद लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची रचना केली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: