Nur Jahan Mango Weight : आंबा (Mango) हा फळांचा राजा म्हटला जातो. हापूस आंबा सर्वात प्रसिद्ध आहे. भारतातील विविध प्रदेशातील आंब्यांचीही स्वतःची खासियत आहे. दसरी, चौसा आणि लंगडा ही आंब्याची नावंही तुम्ही ऐकली असतील, पण तुम्ही पाच किलोच्या आंब्याबद्दल ऐकलं आहे का? होय, हा एक आंबा चक्क पाच किलोचा असतो. याकारणामुळे या आंब्याला आंब्याची राणी असं म्हटलं जातं. या आंब्याचं नावही तसंच आहे.


पाच किलो वजनाचा एक आंबा


या आंब्याचं नाव आहे 'नूरजहाँ' आंबा. 'नूरजहाँ' आंब्या त्याच्या विशेष आकारासाठी ओळखला जातो. या प्रजातीच्या आंब्याचं वजन साधारणपणे तीन ते पाच किलोच्या दरम्यान असतं. भारतासह जगभरात या आंब्याची ख्याती आहे. नूरजहाँ आंबा प्रजातीचं मूळ अफगाण असल्याचं मानलं जातं. हा अफगाणी प्रजातीचा आंब्याचं उत्पादन भारतामध्ये विशेषत: मध्य प्रदेशात घेतलं जातं.


नूरजहाँ आंब्याची सर्वदूर चर्चा


'नूरजहाँ' जातीच्या आंब्याचे जास्तीत जास्त वजन पाच किलोग्रॅमपर्यंत असते. या विशेष जातीच्या आंब्याचं उत्पादन घेणाऱ्यांना झाडाची विशेष काळजी घ्यावी लागते. हवामान अनुकूल राहिल्यास या आंब्याचं उत्पादन चांगलं येतं आणि त्याचे वजनही अधिक असते. सध्या भारतात मध्य प्रदेशातील इंदौर येथीस कठ्ठीवाडा परिसरात या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. या आंब्यांची मोजकी झाडं असल्यामुळे याची मागणी मोठी असून आंब्यांची विक्री जास्त किमतीला होते.


झाडावर आंबे लागण्याआधी बूक होतात आंबे


नूरजहाँ आंब्याची मागणी अधिक आहे. या आंब्याची अगदी काही मोजकी झाडं असल्यामुळे झाडावर आंबे लागण्याआधी यांची ऑर्डर दिली जाते. आंब्याचा मोसमाच्या आधीच नूरजहाँ आंब्याची ऑर्डर द्यावी लागते. हवामान अनुकूल असेल तर, हा आंबा जास्त वजनाचा होतो. हा आंबा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होतो.


येथे केली जाते आंब्यांची लागवड


मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागात नूरजहाँ आंब्याची लागवड केली जाते. गुजरातला लागून असलेला हा परिसर इंदूरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर आहे. एका उत्पादकाने दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत आंबा पिकण्यास तयार होईल. यावेळी एका आंब्याचे वजन चार किलोपेक्षा जास्त असू शकतं.


नूरजहाँ आंब्यांची किंमत काय?


नूरजहाँ आंब्यांची किंमत त्याच्या वजनाप्रमाणेच जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नूरजहाँ आंब्याची चव चाखण्यासाठी तुम्हाला सुमारे 2000 रुपये खर्च करावे लागतील. तर साधारण आंब्यांची किंमत सुमारे 80 ते 100 रुपये किलो असते.