Extramarital Affair : एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करताना तुम्हांला तेथील काही नियम पाळावे लागतात. सर्व कंपन्यांमध्ये सर्वसाधारणपणे सारख्या सोयीसुविधाही देण्यात येतात. तर कंपनीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, अन्यथा दंडही भरावा लागतो. तसेच नोकरी जाण्याचा धोकाही असतो. कोणत्याही कंपनीत रुजू होताना आपल्याला या नियमांची माहिती दिली जाते. दरम्यान, काही कंपन्यांकडून काही विचित्र नियम लागू करण्यात येतात. एका कंपनीच्या नियमानुसार, तुमचे विवाहबाह्य संबंध असतील तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल.
पत्नीला धोका दिला तर, जाईल नोकरी
एका कंपनी एक्स्टामॅरिटल अफेअर म्हणजे विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी अजब नियम लागू केला आहे. नियमानुसार, जर कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील, तर पत्नीला धोका देणाऱ्या अशा कर्मचाऱ्याला कामावरून हटवण्यात येईल. पत्नीला धोका दिल्यास तुमची नोकरी जाऊ शकते. विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी कंपनीनं हा विचित्र नियम लागू केला आहे. पतीने पत्नीशी एकनिष्ठ राहून प्रेम करावं असा या मागचा हेतू आहे.
विवाहबाह्य संबंधांमुळे नोकरीला धोका
हा विचित्र नियम चीनमधील एका कंपनीमध्ये लागू करण्यात आला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये एका विचित्र कंपनीबाबत माहिती देताना सांगितलं आहे. या चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश जारी केला आहे. यानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्यांना नोकरी गमवावी लागू शकते. कंपनीने 9 जूनपासून कर्मचाऱ्यांसाठी हा विचित्र नियम लागू केला आहे.
विचित्र नियम लागू करण्यामागचं कारण काय?
कंपनीने विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा हा नियम लागू केल्याचं सांगितलं आहे. कंपनीच्या या नियमानुसार, लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला आणि पुरुष प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. पत्नीनेही पतीला धोका दिला तर तिलाही कंपनीकडून नारळ देण्यात येईल. कंपनीनुसार, विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा नियम संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आणण्यात आला आहे. कंपनीच्या मते, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कंपनीशी एकनिष्ठ राहावं लागतं. कंपनी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. एकनिष्ठ व्यक्ती कंपनीशीही एकनिष्ठ राहून काम करु शकतो, असं कंपनीचं मत आहे. याशिवाय या कंपनीने घटस्फोटालाही मनाई केली आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया
चीनच्या झेजियांग (Zhejiang) येथील एका कंपनीने हा विचित्र नियम लागू केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ''कोणताही कर्मचारी या अटींचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल. ''4 No's Policy'' पाळणं गरजेचं आहे. यानुसार, कोणतेही अवैध संबंध नाही (No Illicit Relationship), अनैतिक संबंध नाही (No Mistress), विवाहबाह्य संबंध नाही (No Extramarital Affair), घटस्फोट नाही (No Divorce).'' कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कंपनीकडून एका कर्मचाऱ्यावर कारवाई
साऊथ चायना पोस्टच्या रिपोर्टनुसार, कंपनीने एका वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याला कामावरून हटवलं आहे. हा कर्मचारी एका दुसऱ्या महिलेसोबत हातात हात घातून फिरताना दिसला. ही महिला त्याची पत्नी नसून दुसरी महिला होती. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने ही कारवाई केली आहे.