Shauryajit Mallakhamba Gymnast : सध्या गुजरातमध्ये (Gujrat) 36व्या राष्ट्रीय खेळ महोत्सव (National Games 2022) सुरु आहे. या महोत्सवात देशभरातील खेळाडूंचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी 10 वर्षाच्या चिमुकल्याची जोरदार चर्चा आहे. या चिमुकल्याच्या मल्लखांबावरील कवायतींची सध्या चर्चा आहे. या चिमुकल्याच्या शौर्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह सारेच अवाक् झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी चिमुकल्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे.


मल्लखांबावर उत्कृष्ट कवायतींचा व्हिडीओ शेअर


नॅशनल गेम्स 2022 मध्ये 10 वर्षांच्या शौर्यजीतची सध्या प्रचंड चर्चा आहे. 10 वर्षांच्या चिमुकल्या शौर्यजीतने राष्ट्रीय खेळ महोत्सवात मल्लखांबावर उत्कृष्ट कवायती करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या चिमुकल्याच्या कसरतींनी पंतप्रधान मोदीही भारावले. पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शौर्यजीतचा मल्लखांबावर कवायती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  


पंतप्रधानांनी शेअर केला शौर्यजीतचा व्हिडीओ


पंतप्रधान मोदी यांनी शौर्यजीतचा व्हिडीओ ट्विट करत त्याला स्टार म्हटलं आहे. यावर गुजरात इनफॉर्मेशनच्या ट्विट अकाऊंटवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे की, शौर्यजीत राष्ट्रीय खेळ महोत्सवातील सर्वात लहान मल्लखांबपटू आहे.






शौर्यजीतने दिली 'ही' प्रतिक्रिया


शौर्यजीत हा मूळचा गुजरातचा आहे. 30 सप्‍टेंबरला म्हणजेच राष्ट्रीय खेळ महोत्सवाला सुरूवात झाली. या दरम्यान शौर्यजीतच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. असे असतानाही न डगमगता त्याने महोत्सवात सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली. शौर्यजीतने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवावं.'