Costly Height Surgery : 'शौक बडी चीज हैं' असं म्हणतात... पण एका व्यक्तीच्या बाबतीत ही गोष्ट खरी म्हणावी लागेल. या व्यक्तीने आपली उंची वाढवण्यासाठी चक्क महागडी शस्त्रक्रिया केली आहे. अनेकांना आपली उंची जास्त असावी अशी इच्छा असते. पण त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीने त्याची उंची वाढवण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया केली आहे. तीन इंच उंची वाढवण्यासाठी या व्यक्तीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. डेली स्टारच्या वृत्तानुसार, एका माणसाने आपली उंची तीन इंच वाढवण्यासाठी पायाच्या शस्त्रक्रियेवर 130,000 पाउंड म्हणजे सुमारे 1.2 कोटी रुपये खर्च केले.


उंची वाढवण्यासाठी सव्वा कोटी खर्च करत शस्त्रक्रिया


मिळालेल्या रिपोर्टनुसार, रॉय कॉन नावाच्या 68 वर्षीय व्यक्तीने उंची वाढवण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी रॉयची उंची पाच फूट सहा इंच होती, मात्र या शस्त्रक्रियेनंतर त्यांची उंची पाच फूट नऊ इंच झाली आहे. दरम्यान, रॉयला त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान खूप त्रास सहन करावा लागला. त्याला आपली उंची तीन इंच वाढवण्यासाठी खूप पैसाही खर्च करावा लागला. पण रॉय आता त्याच्या उंचीवर समाधानी आहे.


एनआरआय सर्जनने केली शस्त्रक्रिया


कॉस्मेटिक सर्जन केविन देबीपार्शाद यांनी उंची वाढवण्यासाठीची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. डेली स्टारशी बोलताना कॉन यांनी सांगितलं की, 'उंची ही फार मोठी गोष्ट नव्हती. मी लहान असताना याबद्दल विचार करायचो. जेव्हा मला आर्थिक दृष्ट्या हे परवडणारं वाटलं तेव्हा मी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं आणी शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. मला माझ्या उंचीबाबत कोणतीही अडचण नव्हती. फक्त कधी-कधी मला असे वाटले की माझी उंची थोडी कमी आहे. मी जेव्हा शस्त्रक्रियेसाठी जात होतो तेव्हा माझ्या पत्नीला काळजी वाटत होती. मी माझ्या समाधानासाठी ही शस्त्रक्रिया केली, इतर कोणासाठी नाही.'


कॉन यांनी पुढे सांगितलं की, ही शस्त्रक्रिया फार मोठी नव्हती, पण मला ठीक व्हायला थोडा वेळ जाईल. मला पूर्ण बरे होण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल. डॉ. केविन यांनी सांगितलं की, उंची वाढवण्याच्या प्रक्रियेला काही महिने लागतात कारण एक मिलिमीटर उंची वाढवण्यासाठी किमान एक दिवस लागतो. आपल्याला एक इंच उंची वाढवण्यासाठी सुमारे 25 दिवस लागतात आणि तीन इंच वाढवण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिने लागतात. कॉस्मेटिक सर्जन्सने सांगितलं की, प्रक्रियेची किंमत 70,000 डॉलर ते 150,000 डॉलर दरम्यान आहे. रुग्णाला त्याच्या उंचीमध्ये 3, 4, 5 किंवा 6 इंच किती वाढवायची आहे यावर अवलंबून आहे.