Crime News : ई-कॉमर्स वेबसाईटवरुन ऑनलाईन आयफोन मागवून डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोनची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. ग्राहकाने फिल्पकार्टवरुन कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाने आयफोन मागवला होता. डिलिव्हरी बॉय ग्राहकाला फोन द्यायला गेला असता, त्याने निष्पाप डिलिव्हरी बॉयची हत्या केली. आयफोनची दीड लाख रुपये किंमत द्यावी लागू नये, यासाठी आरोपीनं असं केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी न्यूज एजंसीला दिली आहे. 


फ्लिपकार्टवरुन कॅशने मागवला आयफोन


उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला होता. डिलिव्हरी बॉय भरत साहू आयफोन देण्यासाठी चिन्हाट येथील गजाननच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली.


दीड लाखांच्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयला संपवलं


गजाननने फ्लिपकार्टवरून 1.5 लाख रुपयांचा आयफोन कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर केला होता. डिलिव्हरी बॉय भरत आयफोनची डिलिव्हरी देऊन पैसे घेण्यासाठी ग्राहक गजाननच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने आणि त्याच्या एका मित्राने भरतचा गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर गजानन आणि त्याच्या मित्राने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह गोणीत बांधून इंदिरा कालव्यात फेकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, फोनचे पैसे द्यावे लागू नये, यासाठी आरोपींनी हे कृत्य केलं.


मित्राच्या मदतीने डिलिव्हरी बॉयची हत्या


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्हाट येथील रहिवासी असलेल्या गजाननने कॅश ऑन डिलिव्हरी अंतर्गत फ्लिपकार्टवरून दीड लाख रुपयांचा आयफोन ऑर्डर केला होता. निशातगंज येथील रहिवासी असलेला भरत साहू डिलिव्हरीसाठी मुख्य आरोपी गजाननच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला घरात बोलावून त्याचा गळा दाबून खून केला.


आरोपींनी ग्राहकांकडे पोहोचवले उरलेले पार्सल


हत्या केल्यानंतर दोघांनी भरतचा मृतदेह गोणीत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला. यानंतर आरोपींनी डिलिव्हरी बॉयच्या उरलेल्या ग्राहकांच्या डिलिव्हरी स्वत: पोहोचवल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलिसांनी गजाननचा मित्र आकाशला ताब्यात घेतले आहे. पोलीस गजाननचा शोध घेत आहेत. 


25 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार


डीसीपी म्हणाले की, भरत कामासाठी घराबाहेर पडला होता, पण तो घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी 25 सप्टेंबर रोजी चिन्हाट पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. तपास करत असताना पोलिसांनी भरतच्या मोबाईलचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले, त्यावरून त्यांना शेवटचा कॉल गजाननच्या नंबरवरून झाल्याचे समजले. या सुगावाच्या आधारे पोलीस तेथे पोहोचले. चौकशीत आकाशने खुनाची कबुली दिली.