मुंबई: भारतीय रेल्वेचा प्रवास (Indian Railway) म्हणजे एकदम स्वस्तात मस्त आणि तुलनेने अधिक आरामदायी. त्यामुळे रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिकीट मिळणे शक्य नसतं. काहीवेळा वेटिंगमुळे अनेकांची तिकिटे कन्फर्म होत नाहीत, त्यामुळे लोक विना तिकीट ट्रेनने प्रवास करण्याच्या घटना घडतात. वास्तविक विना तिकीट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि टिकीट चेकर तुम्हाला ट्रेनमधूनही बाहेर उतरवू शकतो. त्याचबरोबर विना तिकीट प्रवास केल्यास आर्थिक दंडासोबत तुरुंगापर्यंतची शिक्षा आहे. आता प्रश्न असा पडतो की एखादी महिला प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर टिकीट चेकर तिलाही ट्रेनमधून खाली उतरवणार का? त्यामुळे याबाबत रेल्वेचा काय निर्णय आहे ते पाहुया.


विना तिकीट प्रवास केल्यास टीसी काय करू शकतो? 


जर एखादा प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करताना पकडला गेला तर टीसी त्याला कोचच्या गेटवर उभे करतो आणि ट्रेन थांबलेल्या पुढील स्टेशनवर तो प्रवाशाला डब्यातून खाली उतरवतो. यासाठी अनेक वेळा आरपीएफ किंवा जीआरपीची मदत घ्यावी लागते. पण जर एखादी महिला एकटी असेल आणि तिने तिकीट काढले नसेल तर तिच्यासोबतही असेच वागता येईल का?


एकट्या महिला प्रवाशासाठी हे नियम आहेत (Rule For Woman Travelling Without Ticket) 


विना टिकीट एखादी एकटी महिला प्रवास करत असेल तर त्याबाबत रेल्वेचे नियम थोडे वेगळे आहेत. चेकिंग दरम्यान ती तिकीटाशिवाय आढळल्यास एकाकी महिलेला रात्री अपरात्री कोणत्याही रिकाम्या स्थानकावर डब्यातून उतरवता येणार नाही. याशिवाय दिवसभरातही तिच्या सुरक्षिततेला धोका असेल अशा कोणत्याही स्थानकावर तिला डब्यातून खाली उतरवता येत नाही. टीटीने तिला ट्रेनमधून बाहेर काढले तरीही तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी जीआरपी किंवा आरपीएफची असेल.


जवान महिलेला एस्कॉर्ट करतील आणि तिला जिथे सोडले असेल तिथे ती सुरक्षित आहे याची खात्री करतील. त्यानंतरच जीआरपी किंवा आरपीएफचे जवान ट्रेनमध्ये परततील.


इतर प्रवाशांसोबत मात्र टीसी रेल्वेच्या नियमानुसार कारवाई करू शकतो. विना टिकीट रेल्वे प्रवास केल्यास आर्थिक दंड लागू शकतो आणि रेल्वेतून खालीही उतरवले जाऊ शकते.


ही बातमी वाचा: